प्रकाश सोळंकेंनी पुतण्याला पुढे करताच धाकल्या सूनबाई म्हणाल्या, 'तरीही तुतारी वाजवणार का?'
By सोमनाथ खताळ | Published: August 7, 2024 12:32 PM2024-08-07T12:32:48+5:302024-08-07T12:35:26+5:30
सोशल मीडियावर पोस्ट, शरद पवारांना टोला की पक्षाकडे वाटचाल?
बीड : माजलगावचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी दोन दिवसांपूर्वी राजकीय निवृत्ती घेत पुतण्या जयसिंह सोळंके यांना पुढे केले. यावर लगेच प्रकाश सोळंके यांची धाकली सून पल्लवी सोळंके यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. योग्य नेतृत्व निवडा.. माझा जनतेला प्रश्न आहे... तरीही तुतारी वाजवणार का? असा मजकूर पोस्टमध्ये लिहिला आहे. त्यांच्याकडून हा शरद पवार यांना उपरोधिक टोला आहे की राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे वाटचाल? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
प्रकाश सोळंके यांना दोन मुले असून पल्लवी सोळंके या धाकल्या सून आहेत. मागील दोन वर्षांपासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. तसेच माजलगावच्या भावी नगराध्यक्षा म्हणूनही त्यांची चर्चा सुरू झाली होती. त्यादृष्टीने त्यांनी शहरातही संपर्क वाढविला होता. त्यांचे पती वीरेंद्र सोळंके हे सध्या तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. पल्लवी सोळंके या धारूर येथील दीनबंधू महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष आहेत. सोळंके यांची दोन्ही मुले राजकारणात सक्रिय नाहीत, परंतु धाकल्या सून मागील काही दिवसांपासूनच चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे त्याच आ. सोळंके यांच्या राजकीय वारसदार असतील, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु दोन दिवसांपूर्वी खुद्द आ. सोळंके यांनीच पुतण्या जयसिंह सोळंके यांना राजकीय वारसदार म्हणून पुढे करत विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर लगेच पल्लवी सोळंके यांनी सोशल मीडियावर 'तरीही तुतारी वाजवणार का?' अशी पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो
पल्लवी सोळंके यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांच्यासोबतचा फाेटो व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांची वाटचाल या पक्षाकडे तर नाही ना? असाही तर्क लावला जात आहे. या पोस्टबाबत अद्यापतरी आ. सोळंके यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही.
काय आहे पोस्ट?
माननीय प्रकाशदादांनी काल राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण केला. जे एकापेक्षा एक दिग्गजांना जमले नाही ते दादांनी करून दाखवले. कर्तृत्व, कार्य, विकास अणि लोकांची जिंकलेली मनं ही कधीही संपुष्टात न येणारी गोष्ट. या गोष्टी सिद्ध होण्यासाठी वयाच्या ८३ वर्षापर्यंत वर्चस्व दाखवण्याची गरज नसते. जेव्हा सुरक्षित, ठाम, सर्वव्यापी, आत्मविश्वास पूर्ण मुळं मजबूत असणारं नेतृत्व समाजाला मिळतं तेव्हा खरा उभा राहतो नेतृत्व- रुपी ' सह्याद्री '.
योग्य नेतृत्व निवडा..
माझा जनतेला प्रश्न आहे...
तरीही तुतारी वाजवणार का?