मुलाच्या निधनाची वार्ता कानी पडताच आईनेही सोडले प्राण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 07:17 PM2024-07-12T19:17:28+5:302024-07-12T19:18:02+5:30
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड): आजारी मुलाचेपुणे येथे उपचार सुरू असताना गुरूवारी रात्री निधन झाल्याची वार्ता कानी पडताच आईने देखील प्राण सोडल्याची घटना शेरी बुद्रुक येथे घडली आहे. गहिनीनाथ माणिक वाघूले आणि किसनाबाई वाघूले अशी माय-लेकाची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील नहारवस्ती येथील गहिनीनाथ माणिक वाघूले (५२) हे मागिल काही दिवसांपासून आजारी होते. पाच दिवसांपासून त्याच्यावर पुणे येथील एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरू होते. गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान गहिनीनाथ वाघूले यांचा मृत्यू झाला. याची वार्ता गावी समजताच आई किसनाबाई वाघूले (७०) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गहिनीनाथ यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात शुक्रवारी शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.