पैसे संपल्याने मोबाइल विकला अन् डाव फसला; विद्यार्थिनीवर पळवून नेऊन अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 01:30 PM2022-10-18T13:30:17+5:302022-10-18T13:31:11+5:30
पीडिता स्वाधारगृहात, आरोपी कोठडीत
बीड : औरंगाबादेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला बीडमध्ये नातेवाइकाच्या घरातून तरुणाने पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर पुण्यात विविध ठिकाणी अत्याचार केला. दरम्यान, जवळचे पैसे संपल्याने मुलीने आपला मोबाइल विक्री केला. आयएमईआय क्रमांकावरून पेठ बीड पोलिसांनी छडा लावत आरोपीला १६ ऑक्टोबरला पुण्यात बेड्या ठोकल्या.
योगेश विष्णू जाधव (२३, रा. शास्त्रीनगर, नाळवंडी नाका, बीड) असे आरोपीचे नाव आहे. तो रिक्षाचालक म्हणून काम करतो. पीडित १७ वर्षीय मुलगी औरंगाबादेत आई-वडिलांसह राहते. तिथे ती शिक्षण घेते. दरम्यान, अकरावीला ती बीडमध्ये शिकत होती. तेव्हा तिची ओळख योगेश जाधवशी झाली होती. तेव्हाच त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तेव्हापासून ते दोघे फोनवरून संपर्कात होते. १० सप्टेंबर २०२२ रोजी पीडित मुलगी बीडमध्ये नातेवाइकांकडे आली होती. ११ सप्टेंबरला ती रात्री घरातून बेपत्ता झाली होती. संशयित योगेश जाधववर अपहरणाचा गुन्हा नाेंद झाला होता. उपनिरीक्षक बब्रुवाहन गांधले, पो.ना. अजित शिकेतोड, अंमलदार औदुंबर गिरी यांनी तपास करून १६ रोजी दोघांना पुण्यातील कोथरूड परिसरातील येराई रोडवरील किरायाच्या घरातून ताब्यात घेतले. जवळचे पैसे संपल्याने मुलीने एकास आपल्याकडील १५ हजार रुपयांचा मोबाइल ३ हजार रुपयांत विकला. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी त्यांना शोधून काढले. हा मोबाइलदेखील जप्त केला आहे.
पीडिता स्वाधारगृहात, आरोपी कोठडीत
दरम्यान, अपहरण प्रकरणात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा व बलात्काराचे कलम वाढविले आहे. गुन्हा पेठ बीड पोलिसांकडून पिंक मोबाइल पथकाकडे वर्ग केला. उपनिरीक्षक मीना तुपे, अंमलदार पांडुरंग शिंदे यांनी आरोपी योगेश जाधवला १७ ऑक्टोबरला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तर पीडितेला स्वाधारगृहात पाठविले आहे.
चोरीच्या रिक्षातून पलायन
योगेश जाधव रिक्षावर चालक म्हणून काम करायचा. मालकाच्याच रिक्षातून त्याने पीडितेसह वडवणी येथे चुलत बहिणीचे घर गाठले. मात्र, तिने आश्रय न दिल्याने रिक्षा तेथेच सोडून तो माजलगावला गेला. तेथून ट्रॅव्हल्सने पीडितेला घेऊन तो पुण्याला गेला. इकडे रिक्षामालकाने त्याच्यावर रिक्षाचोरीचा गुन्हा वडवणी ठाण्यात नोंद केला आहे. पलायनानंतर योगेश काही दिवस आपल्या भावाकडे राहिला. त्यानंतर आळंदीला जाऊन लग्न उरकले, अशी माहिती तपासात समोर आली आहे.