परळीतील राख माफियांना लगाम! आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 19:40 IST2025-04-02T19:39:05+5:302025-04-02T19:40:14+5:30

शुल्क भरा आणि राख वापरा आदेशाची अंमलबजावणी सुरू; पोलीस बंदोबस्तात बंधाऱ्यात सोडल्या पोकलेन मशीन

Ash mafia in Parli Thermal Power Station under control! Now only paid agencies will remove the ash | परळीतील राख माफियांना लगाम! आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा

परळीतील राख माफियांना लगाम! आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा

- संजय खाकरे 
परळी ( बीड) :
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको ) अंतर्गत असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपुर येथील बंधाऱ्यातून राख उचण्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता शुल्क भरून अधिकृत पॉंड राख उचलण्यास पात्र 16 निविदाधारक एजन्सीना मंजुरी देण्यात आली आहे. दोन एप्रिल बुधवारी २१ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या बंदोबस्तामध्ये आणि परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या ३० अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नवीन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राख उपसा करण्यासाठी आवश्यक असणारी पोकलेन मशीन यंत्रणा बुधवारी बंधाऱ्यात निविदाधारक एजन्सी चालकाकडून सोडण्यात आली. 

गुरुवारपासून प्रत्यक्षात राख उपसा सुरू होणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यातील राख उपसा महाजनकोने बंद केला होता. गेले काही वर्ष महाजनकोला रॉयल्टी न देताच अनधिकृतपण काही जण राख उपसा करीत होते. दररोज शंभर हायवा टिप्पर भरून राख उचलल्या जात होती. त्यामुळे महाजनकोला आर्थिक फटका होत होता. ही राख वीटभट्टी धारकांना विक्री केली जात होती. याप्रकरणी ओरड झाल्यानंतर महाजकोनी एक जानेवारी 2025 पासून अनाधिकृत होणारा राख उपसा बंद केला होता. यानंतर दाऊतपुर राखण नियंत्रण कृती समितीची स्थापना होऊन शंभर टक्के राख कोटा प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केली होती. पण प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त बाधित गावच्या व्यक्तींसाठी 20 टक्के राख उचलण्यास मान्यता आहे. 

पोलिस बंदोबस्तात राख उचलणार
दरम्यान, गेल्या दीड वर्षांपूर्वी राख उपसा करण्यासंदर्भात निघालेल्या निविदा सूचना मध्ये 16 जण पात्र झाले होते त्यासाठी रक्कमही भरण्यात आली होती. या निविदाधारकांना आता शुल्क भरून व गेट पास घेऊन राख उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यादृष्टीने बुधवारी थर्मल प्रशासनाने पावले उचलले आहेत. बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून थर्मलचे अधिकारी व परळी ग्रामीणचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. थर्मल प्रकल्पग्रस्त दाऊतपुर व परिसरातील 150 जणांचे अर्ज कमी दराने राख उचलण्यास परवानगी द्यावी यासाठी थर्मल प्रशासनाकडे आलेले आहेत. या संदर्भातील निर्णय अद्याप प्रशासनाने घेतलेला नाही अशी माहिती थर्मलच्या सूत्राकडून कळाली आहे. 

राखेस मोठी मागणी
परळी तालुक्यातील दाऊतपुर, दादाहरी वडगाव शिवारात महाजनकोचे नवीन औष्णिक विद्युत केंद्र असून या नवीन विद्युत केंद्रामध्ये 250 मेगावॅट क्षमतेचे तीन संच चालू आहेत. या तीन संचाची एकूण 750 मेगावॅट एवढी विजेची स्थापित क्षमता आहे. वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशापासून तयार झालेली पॉंड राख ही दाऊतपुर येथील राख बंधाऱ्यात सोडण्यात येते. तर फ्लाय ऐश (राख) ही बंकर द्वारे उचलण्यात येते फ्लाय राखेचे अधिकृत टेंडर यापूर्वीच निघालेले आहे. पॉंड राख ही बीड, लातूर , परभणी जिल्ह्यातील वीट भट्टीसाठी वापरले जाते तर फ्लाय राख पुणे ,मुंबई येथे सिमेंट व रस्ते बांधकामासाठी पुरवठा केला जातो.

Web Title: Ash mafia in Parli Thermal Power Station under control! Now only paid agencies will remove the ash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.