राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 17:42 IST2025-04-11T17:41:52+5:302025-04-11T17:42:53+5:30
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते.

राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा
परळी : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मीक कराडची मक्तेदारी ही परळीतील अवैध राख उपसा, वाहतूकीच्या ठिकाणी होती, असा आरोप आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी केला होता. त्यामुळे तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता. पण आता हीच मक्तेदारी मोडीत काढत २ एप्रिलपासून पोलिस बंदोबस्तात थर्मलमधून निघालेली राख उचलली जात आहे. १८ जणांनी निविदा भरल्या आहेत. तसेच या ठिकाणी २४ तास खासगी व पोलिस असा १८ लोकांचा बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, वाल्मीक कराड हा सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारागृहात आहे.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ही राख अनाधिकृतपणे उपसा केली जात होती. यात आमदार धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचेच कार्यकर्ते असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता. आता माजी मंत्री धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची मक्तेदारी मोडीत काढून हा उपसा सुरू आहे.
१८ जणांनी भरली निविदा
राख उपसा करण्यासाठी २०२३ मध्ये १८ जणांनी निविदा व त्याची रक्कमही भरली होती. २०२४ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात २ एप्रिल रोजी राखेचा उपसा करण्यास त्यांना परवानगी दिली. यासाठी १८ जणांनी ३५३ रुपये प्रति टन व जीएसटी आकारून राख उचलणे सुरू केले आहे.
कोठून किती राख?
दाऊदपूरच्या राख बंधाऱ्यातील ८० टक्के राख ही १८ निविदाधारकांना उचलण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर २० टक्के राख ही दाऊतपूर, दादाहारी वडगाव येथील प्रकल्पग्रस्तांना उचलण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. २० टक्केचा कोटा उचलण्यास तातडीने परवानगी देण्याची मागणी ही दाऊतपूर राख नियंत्रण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
निर्णयाची अंमलबजावणी करावी
पोलिस बंदोबस्तात अधिकृत निघालेल्या निविदेनुसार दाऊतपुर राख बंधाऱ्यातून राखेचा उपसा चालू आहे. दाऊतपूर येथून राख उपसा व वाहतूक चालू असताना प्रदूषण होऊ नये, यासाठी घालून दिलेल्या नियमाची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. प्रकल्प बाधित गावच्या लोकांसाठी दाऊतपूर राख कोटा २० टक्के असून, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.
- श्रीकांत फड, सरपंच दाऊतपूर
राख उपसा पोलीस बंदोबस्तात
दाऊतपूर येथील पाैंड राखेच्या विक्रीची निविदाप्रक्रिया पूर्ण केली. दाऊतपूर राख तलाव (बंधारा) मधील ५० टक्के कोट्यातील राख साठा उचलण्यासाठी १८ एजन्सी पात्र असून २ एप्रिलपासून राख उपसा पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला आहे. तसेच नियम व अटी लावण्यात आलेले आहेत. प्रकल्प बाधित गावच्या लोकांसाठी २० टक्के राख साठा राखीव असून, त्यासाठी १५० जणांचे अर्ज आले आहे. याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
- सुनील इंगळे, मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र, परळी