मुंबई बाजार समिती निवडणूकीत अशोक डक बंपर मतांनी विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2020 05:03 PM2020-03-02T17:03:17+5:302020-03-02T17:06:43+5:30
अशोक डकांच्या रूपाने प्रथमच मिळाला बीड जिल्ह्याला बहुमान
माजलगाव : माजलगाव येथील बाजार समितीचे सभापती अशोक डक यानी मुंबई बाजार समितीच्या निवडणूकीत औरंगाबाद महसुल विभागातून नशिब आजमावले होते. त्यासाठी रविवारी मतदान होवून सोमवारी (दि.२ ) निकाल जाहिर झाला. यात अशोक डक यानी २२५ मतांनी बंपर विजय मिळवला. अशोक डक यांच्या या विजयाने जिल्ह्याला मुंबई बाजार समितीवर प्रतिनिधीत्व करण्याचा प्रथमच बहुमान मिळाला आहे.
मुंबई बाजार समितीसाठी दि.२९ फेब्रुवारीस मतदान प्रक्रिया पार पडली. औरंगाबाद महसुल विभागासाठी ९५६ मतदार होते. त्यापैकी ९४४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. औरंगाबाद महसुल विभागातून राष्ट्रवादी-कॉग्रेस-शिवसेना महाविकास आघाडीकडून माजलगाव बाजार समितीचे सभापती अशोक डक, लातुरचे माजी आ.वैजनाथराव शिंदे हे मैदानात होते. तर भाजपाकडून औरंगाबाद बाजार समितीचे सभापती राधाकृष्ण पठाडे, चाकुर बाजार समितीचे सभापती प्रशांत पाटील या दिग्गज उमेदवरांसह ११ उमेदवार नशिब आजमावत होते.
बीड जिल्ह्याला प्रथमच मुंबई बाजार समितीसाठी औरंगाबाद महसुल विभागातून अशोक डक यांच्या रूपाने उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे जिल्ह्याभरातील जनतेचे या निवडणूकीच्या निकालाकडे लक्ष लागले होते. आज सोमवारी (दि.२) जाहिर झालेल्या निकालात ९४४ मतापैकी ६५० मते मिळवत अशोक डक यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर २२५ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाबद्दल माजलगाव शहरासह जिल्ह्याभरात आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
पवार कुटूंबाच्या एकनिष्ठेचे फळ डकांना मिळणार
शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात गोविंदराव डक यांनी त्यांना माजलगाव मतदार संघातून साथ दिली होती. तसेच पुढे ही अशोक डक यांनी वडिल गोविंदराव डक यांच्या पावलावर पाऊल टाकत पवार कुटूंबाशी एकनिष्ठता कायम राखली. त्यामुळे जिल्ह्याला अशोक डक यांच्या रूपाने मुंबई बाजार समितीचे संचालकपद मिळाले. आत्ता याच एकनिष्ठतेचे फळ म्हणून मुंबई बाजार समितीचे सभापती पदी वर्णी लागणार का ? याची उत्सुकता जिल्हावासियांना लागली आहे.