आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:22 PM2018-11-22T12:22:57+5:302018-11-22T12:23:40+5:30

यशकथा :  मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

Ashti farmer defeats drought and successful in Horticulture | आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

आष्टीच्या शेतकऱ्याने दुष्काळावर मात करून माळरानावर फुलविली फळबाग

googlenewsNext

- अविनाश कदम (आष्टी (जि. बीड))

बीड जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील कर्हे वडगावचे मारुती नाना सांगळे यांनी माळरानावर १६ एकर फळबाग फुलवत शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला.

१९९५ पासून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग राबविण्यासाठी  नवनवीन प्रयोगांचा शोध घेत सांगळे यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या. कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती घेतली. कृषी प्रदर्शनातून काही मिळते का, याची चाचपणी केली. मागील १० वर्षांपासून पावसाचा लहरीपणा आणि अनियमिततेमुळे पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या धान्याला योग्य  भाव मिळत नसल्याने त्यांनी शेतीमध्ये बदलाचा निर्णय घेतला.

२००७ मध्ये सांगळे यांनी ७ एकर शेतीमध्ये साई सरबती वाणाची  लिंबोणीची ७०० झाडे लावली.  यापासून जवळपास २० लाखांचे उत्पन्न झाले. त्यामध्ये १७ लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळाला. त्यानंतर प्रगतीच्या वाटा आपोआप खुल्या झाल्या. २०१० मध्ये त्यांनी फळबागेत संत्री लावली. केवळ संत्रीच्या भरवशावर न राहता आंतरपिकांतूनही उत्पन्न मिळविण्याची इच्छा झाली. यात  मिरची, वांगीसारखी आंतरपिके घेत पूरक उत्पन्न प्राप्त केले.

झाडांना फळे भरत असताना २०१२-१३ मध्ये पडलेल्या दुष्काळावर मात करत चार महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करून बाग तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली. फळबागेतून योग्य मोबदला मिळू लागल्याने त्यांनी उर्वरित शेतीमध्ये वेगवेगळ्या  फळबागांचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या सीताफळाच्या बाळानगरी आणि धारूर अशा विविध सहा जातींच्या तीन हजार झाडांची लागवड केली. केशर वाणाचे आंबे आणि नारळाची प्रत्येकी ५०- ५० झाडे लावली. पावसाच्या लहरीपणामुळे त्यांनी या फळबागांना लागणाऱ्या पाण्यासाठी तीन विहिरी, पाच बोअरवेल घेतले; परंतु तरीही पाण्याची  कमतरता भासू लागल्याने १५० ते २०० मीटरचे शेततळे केले. जवळपास अडीच कोटी लिटर क्षमतेच्या या शेततळ्याने सध्याच्या दुष्काळात पाणी कमी पडणार नाही, असे नियोजन केल्याचे मारुती सांगळे म्हणाले.

६५ वर्षांचे मारुती सांगळे आणि त्यांच्या पत्नी हे दोघे मजुरांच्या सहाय्याने ही सर्व कामे पाहतात. ते फळबागांना पूर्णपणे सेंद्रिय, जैविक, कोंबडी खतांचा वापर करतात. त्यांनी संपूर्ण शेतीमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्यांनी गांडूळ खताचाही प्रकल्प सुरू केला आहे. यापुढे चंदनाची लागवड करण्याचा त्यांचा मानस आहे. विविध पुरस्कार मिळविणारे सांगळे म्हणतात, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून आधुनिकतेची कास धरावी. कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळेल, याचे नियोजन केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घेतला पाहिजे. कितीही कर्ज  झाले तरीही न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट व प्रयत्न करत राहिले  पाहिजे. यामुळे अशक्य ते शक्य होण्याला वेळ लागत नाही.

Web Title: Ashti farmer defeats drought and successful in Horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.