आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:20+5:302021-09-17T04:40:20+5:30

अविनाश कदम आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर ...

In Ashti taluka 15 small and 6 medium projects were filled up | आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

आष्टी तालुक्यात १५ लघु, ६ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले

googlenewsNext

अविनाश कदम

आष्टी : तालुका कायम दुष्काळी समजला जातो. परंतु यंदा पर्जन्यमान ब-यापैकी झाल्याने तालुक्यात पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन टंचाईचा सामना करणारे नागरिक व शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे. तीन महिने पावसाळा उलटूनही तालुक्यातील धरणे कोरडी ठाक होती, मात्र ३१ ऑगस्ट व ४ ते ८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस झाल्याने सर्व तलाव नदी, नाले ओव्हरफ्लो झाले. तालुक्यातील १५ लघु प्रकल्प ,६ मध्यम प्रकल्प,८ साठवण तलाव, १० बंधारे, यापैकी फक्त ३ लघु प्रकल्प व जोत्याखालील ४ प्रकल्प सोडता सर्व तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत.

मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने शेतकरी आनंदित झाला आहे.

तालुक्यातील आष्टी, कडा, धामणगाव,धानोरा, दौलावडगाव, टाकळसिंग, पिंपळा मंडळामध्ये पेरणी योग्य पाऊस झाल्याने बळीराजाने उसनवारी करून कोरोनासंकटात काळ्या आईची ओटी भरली पाऊस वेळेवर झाला. तर पिके ऐन फळधारणेत असताना पावसाने ओढ दिल्याने पिकांचे उत्पन्न घटले. त्यानंतर पुन्हा पिके काढणीला असताना ३१ ऑगस्टच्या रात्री पावसाने जोरदार हजेरी लावल्याने काही नदी, तलाव ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर पुन्हा ४ सप्टेंबर रोजी तालुक्यात अतिवृष्टी झाली. तीन वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस यंदा झाल्याने पाणी साठ्यात वाढ झाली. परंतु तोंडात भरवायला आलेला घास मेघराजाने हिसकावून नेला. शेतक-यांचे पीक वाहून तर काही पाण्याने सडले.

या जोरदार पावसामुळे तालुक्यातील मध्यम प्रकल्प मेहकरी ६४ टक्के, तर कडा, कडा, रुटी, तलवार, कांबळी हे प्रकल्प तुडुंब झाले आहेत. वेलतरी, पांढरी लघु तलाव, ब्रह्मगाव, किन्ही, चोभा निमगाव, वडगाव, बेलगाव, मातकुळी सिदेवाडी, बळेवाडी, सुलेमान देवळा, धामणगाव, पांढरी, जळगाव, हे लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने ओसंडून वाहत आहेत. केळ, लोणी, पिंपळा, पारगाव जो. १,पारगाव जो. २, कुंठेफळ, कोयाळ, पिंपरी घुमरी येथील धरणे कोरडीठाक आहेत. या परिसरातील गावांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

चौकट

शेतकऱ्यांनी पाण्याचा जपवून वापर करावा

यावर्षी जोरदार पावसाने बऱ्यापैकी तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. १५ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत पाण्याच्या आरक्षण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होऊन निर्णय घेतला जातो. १५ ऑक्टोबरपासून कोणत्या तलावात पाणी सोडायचे हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतर तलावातून पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. शेतकऱ्यांनी पाणी वापरताना जपून वापर करावा जेणेकरून यावर्षी सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. देवेंद्र लोकरे, सहायक अभियंता (वर्ग १), आष्टी.

Web Title: In Ashti taluka 15 small and 6 medium projects were filled up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.