आष्टी व्यापारी असोसिएशनचा लाॅकडाऊनला तीव्र विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:43+5:302021-03-26T04:33:43+5:30
आष्टी : बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद ...
आष्टी : बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला आष्टी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून, याबाबतचे आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार राजाभाऊ कदम यांना गुरुवारी निवेदन दिले.
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यांत वाढीचा वेग अत्यल्प आहे. स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या अँटिजन टेस्ट केल्या असून, यामध्ये बोटावर मोजण्याइतकेच बाधित झाल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनाने पूर्णपणे बंद न करता जिथे रुग्ण आढळेल तो भाग कन्टेन्मेंट घोषित करून कडक निर्बंध लावावेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणारे व्यापारी व नागरिकांवर कडक कारवाई करावी. तालुक्यातील बाजारपेठा पूर्णपणे ठप्प राहिल्यास नागरिक शेजारील तालुक्याच्या बाजारपेठेत ये-जा करू शकतात. त्यामुळे या लाॅकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही. प्रशासनाने फेरविचार करून बाजारपेठा पूर्ववत सुरू ठेवण्याचे आदेशित करावे या निवेदनावर व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संपत शेळके, संजय मेहेर, अतुल मेहेर,
यांच्यासह ६४० व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत. यावेळी भारत मुरकुटे, सुनील रेडेकर, अक्षय धोंडे, अक्षय हळपावत, नितीन मेहेर, शैलेश सहस्त्रबुद्धे, प्रीतम बोगावत, अभय मेहेर आदी उपस्थित होते.
८५ टक्के जनतेचे हातावर पोट
जिल्हा लाॅकडाऊन करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाला आष्टी तालुक्यातील व्यापाऱ्यांचा विरोध असून, आमच्याकडे हातावर पोट भरणाऱ्या माणसांची संख्या ८५ ते ९० टक्के आहे. ज्या ठिकाणी जास्त पेशंट आहेत. तिथे कन्टेन्मेंट झोन करा ज्या उपाययोजना करायच्या त्या करा. परंतु लाॅकडाऊन करू नका अन्यथा लोक, व्यापारी, बिगारी कामगार रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत जिल्हाधिकाऱ्यांनी या लाॅकडाऊनचा फेर विचार करावा
- सुरेश धस, विधान परिषद सदस्य
===Photopath===
250321\img-20210325-wa0280_14.jpg