आष्टीचा १ हजार कोटींचा देवस्थान जमीन घोटाळा; रॅकेटच्या मुळाशी पोहोचणार का तपास यंत्रणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:13 PM2022-12-03T12:13:26+5:302022-12-03T12:14:10+5:30
या तक्रारीत थेट नामोल्लेख असल्याने आमदार सुरेश धस यांनी हा दावा खोडून काढला, पण राम खाडे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला.
बीड : आष्टी तालुक्यातील कथित हिंदू देवस्थान जमिनीच्या बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात २९ नोव्हेंबरला भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह पाच जणांवर फसवणूक व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सुमारे एक हजार कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या २१२ हेक्टर जमीन घोटाळ्याच्या मुळाशी तपास यंत्रणा पोहोचणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, आरोपींमध्ये महसूलमधील एकाही अधिकाऱ्याचा थेट नामोल्लेख नाही. मात्र, तपासात काही अधिकाऱ्यांचा सहभाग आढळू शकतो.
विठोबा देवस्थान, मुर्शदपूर, विठोबा देवस्थान, पांढरी, विठोबा देवस्थान, खडकत, खंडोबा देवस्थान, बेलगाव, श्रीरामचंद्र देवस्थान, आष्टी, श्रीरामचंद्र देवस्थान, चिखली, श्रीरामचंद्र देवस्थान, चिंचपूर व पिंपळेश्वर देवस्थान, आष्टी या देवस्थानांच्या मालकीच्या सुमारे २१२ हेक्टर जमिनीचे बेकायदेशीरपणे हस्तांतरण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राम खाडे यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीत थेट नामोल्लेख असल्याने आमदार सुरेश धस यांनी हा दावा खोडून काढला, पण राम खाडे यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. अखेर २५ नोव्हेंबरला खंडपीठाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत आमदार धस यांची याचिका फेटाळली. २९ नोव्हेंबर रोजी आमदार सुरेश धस, पत्नी प्राजक्ता, बंधू देविदास धस, मनोज रत्नपारखी, अस्लम नवाब खान व अन्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तथापि, १ डिसेंबर रोजी आमदार धस यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडताना तपास यंत्रणेला सहकार्य करण्याचे आश्वासन देत देवस्थानाची जमीन कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे हस्तांतरित झालेली नाही, या प्रकरणाशी संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सूत्रधार कोण, महसूलमधील कोणाकोणाचा यात सहभाग आहे, या बाबींचा छडा लावण्याचे आव्हान लाचलुचपत प्रतिबंधक विभागापुढे आहे.
तपास यंत्रणेला हवीत या प्रश्नांची उत्तरे...
जमिनीचे प्रकार किती, देवस्थानच्या मालकीच्या जमिनीचे हस्तांतरण करता येते का, त्याचे निकष काय, यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते, आठ देवस्थानांची जमीन खासगी लाेकांच्या नावे हस्तांतरित करताना नेमक्या कुठल्या नियमांचे उल्लंघन झाले. एकूण घोटाळा कसा झाला, यामागे मास्टरमाईंड कोण, कोणाकोणाच्या नावे जमिनी हस्तांतरित केल्या. या प्रश्नांची उत्तरे तपास यंत्रणेला हवी आहेत. त्यानंतरच तपासाची दिशा ठरणार आहे.
ठाणेप्रमुख रजेवर, खाडे आउट ऑफ.. योगायोग की...
राम खाडे यांची तक्रारच एफआयआर म्हणून गृहीत धरून कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले होते, त्यामुळे खाडे यांच्या गैरहजेरीत २९ नोव्हेंबरला गुन्हा नोंदविण्यात आला. यावेळी ठाणेप्रमुख पो.नि. सलीम चाऊस रजेवर होते, सध्या सहायक निरीक्षक विजय देशमुख यांच्याकडे प्रभारी कार्यभार आहे. धसांविरोधात फिर्याद व ठाणेप्रमुख रजेवर हा योगायोग की ठाणेप्रमुखांनी मुद्दामच हा मुहूर्त साधून सुटी घेतली, याबाबत चर्चा आहे. दरम्यान, खाडे यांच्यावर अहमदनगर जिल्ह्यात गुन्हा नोंद आहे, त्यामुळे ते आउट ऑफ कव्हरेज आहेत. ज्या देवस्थान जमीन घोटाळ्यात खाडे ३२० दिवस झटले, तो गुन्हा नोंद होण्यापूर्वीच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाल्याचा योगायोग की राजकीय खेळी, याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
जमीन हस्तांतरणासंदर्भात शासन निर्णय कुठले आहेत, त्यासाठीचे निकष काय, याबाबतची सविस्तर माहिती महसूल व भूमिअभिलेखकडून मागवली आहे. यासंदर्भात सर्व माहिती घेऊन नेमकी फसवणूक कशा पद्धतीने केली, याचा छडा लावण्यात येईल.
- शंकर शिंदे, उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड