आष्टीच्या अविनाशचा राष्ट्रीय स्पर्धेत विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:33 AM2021-03-19T04:33:06+5:302021-03-19T04:33:06+5:30
आष्टी : पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश ...
आष्टी : पतियाळा येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषक वरिष्ठ राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत बुधवारी महाराष्ट्राच्या अविनाश साबळे आणि सर्वेश कुशारे यांनी सुवर्णपदकांची कमाई केली, तर कोमल जगदाळेने रौप्यपदक पटकावले. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रमही नोंदवला. २६ वर्षीय अविनाशने ८ मिनिटे २०.२० सेकंद अशी वेळ नोंदवताना २०१९ मधील स्वत:चाच ८ मि. २१.३७ से. वेळेचा विक्रम मोडीत काढला. राजस्थानच्या शंकर लाल स्वामीने रौप्य व हरयाणाच्या राजकुमारने कांस्यपदक मिळवले.
महिलांच्या ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये कोमलने १० मिनिटे ०५.४३ सेकंदांची वेळ नोंदवताना दुसरा क्रमांक मिळवला, पहिला क्रमांक उत्तर प्रदेशच्या परूल चौधरीने मिळवला. उंच उडी स्पर्धेत सर्वेशने (२.१५ मीटर) सुवर्णपदक मिळवले, तमिळनाडूच्या आदर्श रामला (२.१० मीटर) रौप्यपदक मिळाले. भालाफेक स्पर्धेत हरयाणाच्या नीरज चोप्राने (८७.८० मी.) सुवर्णपदकाची कमाई करताना नवा स्पर्धाविक्रम केला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शब्बास रे पठ्ठे असे ट्विट करून स्वागत केले. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे यांनी केलेल्या कामगिरीबद्दल आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आ. भीमराव धोंडे, माजी आ. साहेबराव दरेकर यांच्यासह क्रीडाप्रेमींनी स्वागत केले आहे.
===Photopath===
180321\img-20210318-wa0387_14.jpg