‘मॅग्मो’ अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आष्टीचे ‘वाघ’ विजयी

By सोमनाथ खताळ | Published: September 26, 2022 05:28 PM2022-09-26T17:28:55+5:302022-09-26T17:29:40+5:30

सचिवपदी विकास मोराळे : प्रीतम लोध, चैतन्य कागदे यांचा पराभव

Ashti's Dr. Prasad Wagh wins in 'Magmo' presidential election | ‘मॅग्मो’ अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आष्टीचे ‘वाघ’ विजयी

‘मॅग्मो’ अध्यक्षपदाच्या निवडणूकीत आष्टीचे ‘वाघ’ विजयी

googlenewsNext

बीड : प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या (मॅग्मो) अध्यक्ष व सचिव पदासाठी रविवारी सायंकाळी निवडणूक झाली. यात डॉ. प्रीतम लोध यांचा पराभव करून डॉ. प्रसाद वाघ हे अध्यक्ष झाले, तर डॉ. चैतन्य कागदे यांचा पराभव करून डॉ. विकास मोराळे हे सचिव झाले. शांततेत झालेल्या या निवडणुकीत ६० डॉक्टरांनी आपला हक्क बजावला.

मॅग्माे ही शासकीय डॉक्टरांची संघटना आहे. चार महिन्यांपूर्वी संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यामुळे अध्यक्षांसह सचिवपदासाठी निवडणूक घेतली जाणार होती; परंतु याला अनेक अडथळे आले. तीन वेळा दिवस निश्चित होऊनही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. अखेर २५ सप्टेंबर रोजी ही निवडणूक झाली. यात अध्यक्षपदासाठी टाकळसिंग आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद वाघ, ताडसोन्ना येथील डॉ. प्रीतम लोध आणि सादोळा येथील डॉ. रमेश घुमरे यांनी अर्ज दाखल केले; परंतु डाॅ. घुमरे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने डॉ. वाघ व डॉ. लोध यांच्यात लढत झाली. 

यात डॉ. वाघ यांना ३९ मते पडली, तर डॉ. लोध यांना २१ मतांवरच समाधान मानावे लागले. १८ मतांनी डॉ. वाघ विजयी झाले. तसेच सचिवपदासाठी येळंबघाट येथील डॉ. चैतन्य कागदे आणि नागापूरचे डॉ. विकास मोराळे यांच्यात लढत झाली. यात डॉ. मोराळे यांना ३३, तर डॉ. कागदे यांना २७ मते पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्येष्ठ सदस्य तथा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. संजय कदम यांनी काम पाहिले.

अन्यायाविराेधात आवाज उठविला जाईल. चुकीच्या गोष्टींचे समर्थन केले जाणार नाही. डॉक्टरांसाठी मी आणि संघटना कायम तत्पर असू. ही निवडणूक खरोखरच खूप प्रतिष्ठेची झाली होती; परंतु डॉ. नितीन मोरे आणि डॉ. अनिल आरबे यांच्यासह अनेकांनी मला पाठबळ दिले. दिलेली जबाबदारी चोख पार पाडेल, अशी ग्वाही देतो.
- डॉ.प्रसाद वाघ, अध्यक्ष, मॅग्मो, बीड

 

Web Title: Ashti's Dr. Prasad Wagh wins in 'Magmo' presidential election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.