आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी; फळबागेतून तरुण उद्योजकाची यशस्वी भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 07:51 PM2022-11-23T19:51:30+5:302022-11-23T19:51:57+5:30

या दाम्पत्याने जिद्दीला कष्टाची जोड देऊन इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या दोन वर्षांतच पेरूची फळबाग फुलवली.

Ashti's guava is also sweet in Gujarat; Successful launch of a young entrepreneur from an orchard | आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी; फळबागेतून तरुण उद्योजकाची यशस्वी भरारी

आष्टीच्या पेरूची गुजरातमध्येही गोडी; फळबागेतून तरुण उद्योजकाची यशस्वी भरारी

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा (बीड) :
खाकळवाडी येथील ईश्वर शिंगटे या तरुण उद्योजकाने निराश न होता वडिलोपर्जित शेतीला पूर्णवेळ दिला. शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत तीन हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून १००० पेरूच्या झाडांची यशस्वी लागवड करून उत्कृष्ट फळबाग फुलवली. या बागेतून एकाच वर्षात अडीच लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे आष्टीकरांच्या पेरूची गोडी गुजरातमधील सुरत तर महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरसारख्या मोठ्या शहराच्या बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरला आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे बऱ्याचदा शेतीचा उद्योग म्हटला की तोट्याचेच गणित समोर येते. त्यातच बाजारपेठेत शेतीमालाचे सतत कोलमडणारे भाव उत्पन्नपेक्षा शेतीला लागणारा खर्च अधिकच होत असतो. त्यामुळे शेतीसाठीचा खर्च आणि उत्पन्नाचा कुठेच ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी वर्ग हा निराशेपोटी खचून जातो. मात्र, शेतीचा उद्योग करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उत्कृष्ट नियोजन करून त्यास कष्टाची जोड असेल तर शेतीच काय; पण कुठलाच व्यवसाय हा नुकसानकारक नाही. हेच आष्टी तालुक्यातील खाकाळवाडी येथील ईश्वर काशिनाथ शिंगटे व त्यांच्या पत्नी छायाताई ईश्वर शिंगटे या कष्टाळू दाम्पत्यांनी दाखवून दिले आहे.

ईश्वर शिंगटे यांनी तीन हेक्टर क्षेत्रावर पेरू फळबागेची नियोजनबद्ध यशस्वी लागवड केली आहे. एका वर्षात जवळपास अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न घेऊन शेतीबाबत नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी शिंगटे यांचा अन्नप्रक्रिया करण्याचा उद्योग कोरोनामुळे अडचणीत आला होता. त्यामुळे दरम्यानच्या काळात त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र, या परिस्थितीमुळे हताश न होता सकारात्मक दृष्टिकोन बाळगून आपल्या वडिलोपर्जित शेतीकडे पुन्हा एकदा मोठ्या जिद्दीने लक्ष केंद्रित केले.

शासनाच्या पोखरा योजनेंतर्गत २०२० ला तीन हेक्टर क्षेत्रात शेती तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पेरूची फळबाग लावली. नाशिक जिल्ह्यातील येवला येथून तैवान जातीची एक हजार पेरूची रोपे आणून ३ बाय ५ अंतरावर खड्डे खोदून यशस्वी लागवड केली. तसेच पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणालीचा वापर केला. आतापर्यंत फळ बागेसाठी खते, औषधे, मशागत, फवारणी व मजुरांसहीत दीड लाखाचा खर्च झाल्याचे शिंगटे यांनी सांगितले.

या दाम्पत्याने जिद्दीला कष्टाची जोड देऊन इच्छाशक्तीच्या बळावर अवघ्या दोन वर्षांतच पेरूची फळबाग फुलवली. सध्या शेकडो पेरूच्या झाडांना मोठी-मोठी चमकदार फळे लगडलेली पहावयास मिळतात. पेरूच्या शेतीतून वर्षाला जवळपास अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे या पेरूच्या बागेतच सोयाबीन, उडीद, हरभरा यांसारखी नगदी आंतरपीक घेऊन शेतीच्या उत्पन्नात अजूनच दुपटीने वाढ करून दाखवली आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियोजन
प्रत्येक शेतकऱ्यांनी शेती करताना ईश्वर शिंगटे यांच्यासारखा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नियोजन व योग्य मार्गदर्शन करून कष्टाची जोड दिल्यास शेती तोट्याची ठरत नाही. तसेच शेतीविषयक शासकीय योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधली पाहिजे.
-घनश्याम सोनवणे, कृषी सहायक.

Web Title: Ashti's guava is also sweet in Gujarat; Successful launch of a young entrepreneur from an orchard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.