‘लोकमत’च्या वृत्तानंतर आष्टी पोलिसांना जाग; पीडितेसह कुटूंबियांना दिले संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 04:37 PM2019-06-10T16:37:04+5:302019-06-10T16:39:23+5:30
आरोपीला तात्काळ अटक न केल्यास कारवाईची तंबीही एसपींनी दिली आहे.
बीड : अत्याचार प्रकरणातील आरोपीने आष्टी पोलिसांना चकवा देत ठाण्यातून पलायन केले होते. या आरोपीपासून पीडिता व तिच्या कुटूंबियांना भिती होती. याबाबत संरक्षणाची मागणी करूनही आष्टी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर लोकमतने हा प्रकार समोर आणल्यानंतर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी आष्टीच्या पोलीस निरीक्षकांची चांगलीच कानउघडणी केली. सोमवारी पीडितेसह कुटूंबियांना संरक्षण देण्यात आले. तसेच आरोपीला तात्काळ अटक न केल्यास कारवाईची तंबीही एसपींनी दिली आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे एका १९ वर्षीय तरूणीला चाकुचा धाक दाखवून गावातीलच सुनिल डुकरे याने अत्याचार केला होता. ही घटना ३ जून रोजी घडली होती. त्यानंतर आष्टी पोलिसांनी सुनिलला चौकशीसाठी म्हणून ठाण्यात आणले. येथे त्याने आष्टी पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले होते. त्यामुळे त्याच्यापासून अथवा त्याच्या जिवाला धोका असण्याची भिती व्यक्त केली जात होती. एवढ्यात पीडितेच्या भावाने आष्टी पोलीस निरीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली होती. मात्र, आष्टी पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले.
हाच धागा पकडून लोकमतने सर्व बाजू समजून घेत वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला. त्यानंतर सोमवारी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी आष्टीचे पोलीस निरीक्षक माधव सुर्यंवशी यांची चांगलीच कानउघडणी केली. तपासात हलगर्जी करू नये, तसेच पीडितेला संरक्षण देण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पीडितेच्या घराजवळ एक कर्मचारी कायमस्वरूपी नियूक्त करण्यात आला आहे.
अपर अधीक्षकांनीही घेतले फैलावर
आरोपीने पलायन केलेले असतानाही आष्टी पोलिसांनी ही बाब अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्यापासून लपविली होती. हा प्रकार समजताच कबाडे यांनी उपअधीक्षक विजय लगारे आणि पोनि सुर्यंवशी यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्यानंतर हे सर्व प्रकार समोर आला.
वय चुकल्याचा केला खुलासा
फिर्यादीत पीडितेचे वय १७ वर्षे व जबाबात १९ होते. हा प्रकार सीसीटीएनएसमध्ये अपलोड करताना चुक झाल्याचा खुलासा पोनि माधव सुर्यवंशी यांनी अपर अधीक्षक विजय कबाडे यांच्याकडे केला आहे. यासंदर्भात त्यांनी लेखी पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
पीडिता व कुटूंबियांना सरंक्षण दिले आहे. तसेच आरोपीलाही तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तपासात हलगर्जी केल्यास चौकशी करून कारवाई करू.
- जी.श्रीधर, पोलीस अधीक्षक, बीड