आष्टीच्या उसतोड मजुराच्या मुलाचा मंगळवेढा कारखान्यावर काम करताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 05:04 PM2020-12-16T17:04:09+5:302020-12-16T17:05:56+5:30
गव्हाणीत पडल्याने 18 वर्षीय युवकांचा मृत्यू
कडा ( बीड ) : कचरा काढत असताना पाय घसरुन गव्हाणीत पडल्याने चैनमध्ये अडकून एका १८ वर्षीय मुलाचा मंगळवेढा येथील साखर कारखान्यात मृत्यू झाला. महावीर माणिक गर्जे (वय.18 रा.हातोला ता.आष्टी,जि.बीड ) असे मृताचे नाव असून त्याचे पालक उसतोड मजूर असून याच कारखान्यावर काम करतात.
आष्टी तालुक्यातील हातोला येथील माणिक गर्जॅ हे मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे उसतोड मजूर म्हणून काम करतात. कारखान्यावरती बैलगाडीने ऊस वाहतूक करतात. घरात अठरा विश्व दारिद्र्य असल्यामुळे मुलांना देखील वडिलांना हातभार लावावा लागत होता. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे महाविद्यालय बंद आहेत. गर्जे यांचा १२ वित असणारा मुलगा महावीर पालकांना मदत म्हणून त्यांच्यासोबत कारखान्यावर आला. घरची हलाखीची परिस्थिती असल्याने महावीर येथे कामगार म्हणून ऊस टाकण्याच्या गव्हाणीत काम करू लागला. कारखान्यावरती रात्रपाळीला उसाच्या कांड्या गोळ्या करण्याच्या कामावर जात असे. मंगळवारी सकाळी कचरा काढत असताना पाय घसरुन महावीर गव्हाणीत पडला. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र चैनमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.