मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच आष्टीच्या तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 05:17 PM2022-11-17T17:17:07+5:302022-11-17T17:25:09+5:30
सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे तरुणाचा जीव वाचला.
आष्टी (बीड) : जिल्ह्यातील आष्टी येथील बापू नारायण मोकाशे या तरुणाने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षततेसाठी लावण्यात आलेल्या जाळीमुळे सदर तरुणाचा जीव वाचला. दरम्यान, हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
आष्टी तालुक्यातील पारगांव जोगेश्वरी येथील मुंजाबा वस्तीवर बापू नारायण मोकाशे एकटा राहतो. बापूचे शिक्षण इंजिनीअर डिप्लोमापर्यंत झाले आहे. त्याने काहीकाळ पुणे येथील खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. त्यानंतर गावी येऊन शेती करू लागला. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील त्याने सुरु केला होता. मध्येच जामखेड येथील इंजिनिअरिंग कॉलेजला प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तेथील नोकरी सोडत टाकळी डोकेश्वर, नगर मध्ये एक दोन वर्षे वास्तव्यास होता. त्यानंतर गावी राहायला आला. गेल्या दोन तीन वर्षांपासून बापू एकटाच राहत असे. पत्नी दोन मुलांसह माहेरी राहते. गेल्या चार पाच दिवसांपासून तो गावात दिसला नव्हता.
दरम्यान, आज दुपारी त्याने मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला. यामागे कोणते कारण असावे, याबाबत अद्याप उलगडा झाला नाही. अहमदनगर येथे काही वर्षांपूर्वी राहत होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याची माहिती पारगाव येथील ग्रामस्थांनी दिली आहे. मनोविकारातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी चर्चा आहे.
प्रेयसीला न्याय द्यावा
पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले असून उपचारासाठी त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला रूग्णवाहिकेतून रूग्णालयात नेले जात असताना आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे कारण विचारण्यात आले असता आपल्या प्रेयसीवर बलात्कार झाला असून न्याय मिळत नसल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.