आष्टीत तलाठी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:22 AM2021-06-30T04:22:10+5:302021-06-30T04:22:10+5:30
धानोरा ते कुंभारवाडी अवैध वाळू उत्खनन चालू असताना तलाठी अनिल ठाकरे यांना वाळू माफियांकडून २५ जून रोजी मारहाण झाली ...
धानोरा ते कुंभारवाडी अवैध वाळू उत्खनन चालू असताना तलाठी अनिल ठाकरे यांना वाळू माफियांकडून २५ जून रोजी मारहाण झाली होती. त्या अनुषंगाने अंभोरा पोलीस ठाण्यात नागेश अशोक होळकर (रा. धानोरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. अशा प्रकारे जर आरोपी वाळू माफियांवर कारवाई होत नसेल तर यापुढे वाळू माफियांची मुजोरी अशीच चालू राहील. अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांवर कारवाई करण्यास धजावणार नाहीत. त्यामुळे आरोपीला तत्काळ अटक करून कारवाईची मागणी तलाठी व मंडळ अधिकारी संघटनेने केली आहे. २९ जूनपासून आपत्ती व्यवस्थापन आणि कोविड-१९ ची कामे वगळता अन्य सर्व कामांचे लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर तलाठी संघटनेचे अध्यक्ष शरद शिंदे, उपाध्यक्ष एस. एन. गवळी, सचिव एन. एस. चव्हाण, पी. के. माढेकर, जी. बी. ससाणे, एस. एस. पाटील, ए. वाय. सुरवसे, सोनाली कदम, प्रियंका घोडके, छाया मिश्राम, शेळके आदी तलाठ्यांच्या सह्या आहेत.
आरोपीस चोवीस तासांत अटक करणार
तालुक्यातील धानोरा येथील तलाठ्यास मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस चोवीस तासांत अटक करण्यात येईल, असे अंभोरा पोलीस ठाण्याचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल लोखंडे यांनी सांगितले.