छावणी प्रकरणात कारवाईसंदर्भात आयुक्तांकडून प्रशासनाला विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:40 PM2019-08-11T23:40:16+5:302019-08-11T23:41:08+5:30
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु होत्या, या छावण्यांमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाने व जिल्हा स्तरावर या छावण्यांची अचानक तपासणी केली होती.
बीड : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर छावण्या सुरु होत्या, या छावण्यांमध्ये काही गैरप्रकार सुरु असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तालयाच्या पथकाने व जिल्हा स्तरावर या छावण्यांची अचानक तपासणी केली होती. या तपासणीत आढळलेल्या त्रुटींचा अहवाल आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला दोन महिन्यापूर्वी दिला होता. यावर जिल्हा प्रशासनाने काय कारवाई केली याची विचारणा विभागीय आयुक्तांनी केली आहे. मात्र, हा अहवाल अद्यापपर्यंत पाठवण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाला ८ आॅगस्टची मुदत देण्यात आली होती.
बीड जिल्ह्यातील कोल्हारवाडीच्या छावणीवर गैरप्रकारामुळे व तेथे तपासणीसाठी गेलेल्या महिला उपजिल्हाधिकारी यांना अडविल्यामुळे जिल्ह्यातील छावण्यांमधील गैरप्रकार प्रशासनाच्या रडारवर आला होता. त्यानंतर उपायुक्तांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध चारा छावण्यांना भेटी देऊन पाहणी केली होती.
या तपासणीत पथकाला आढळलेल्या त्रुटींचा अहवाल आयुक्तालयाने जिल्हा प्रशासनाला देऊन त्यानुसार कारवाईचे निर्देश दिले होते. यात छावणी चालकांवरील कारवाईसोबतच प्रशासकीय पातळीवरील म्हणजेच कर्मचाऱ्यांवरील कारवाईचाही समावेश होता. मात्र दोन महिन्यापूर्वी सदर अहवाल आल्यानंतरही जिल्हा प्रशासनाने यावर काय कारवाई केली , हे मात्र समजू शकले नाही त्यामुळे या अहवालाचे गूढ कायम आहे.
त्यामुळे जुलैच्या शेवटी विभागीय आयुक्तांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन या अहवालानुसार कोणाविरुद्ध काय कारवाई केली याची माहिती मागितली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने याबाबत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाºयांना विचारणा केली असली तरी नेमकी कोणत्या कर्मचाºयावर जबाबदारी निश्चित केली हे अद्यापपर्यंतसमोर आले नाही. तसेच छावणीप्रकरणात काय कारवाई झाली हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. त्यामुळे आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.