कपड्याच्या बिलावर मागितला मोबाईल नंबर, नंतर गोड बोलून अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 04:28 PM2022-03-28T16:28:20+5:302022-03-28T16:28:53+5:30
कपडे दाखविण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.
गेवराई : दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिलेला चहा पाजला, त्यानंतर बिलावर लिहिण्याचा बहाणा करून मोबाईल नंबर मागितला व गोड बोलून नंतर अत्याचार केला. हा प्रकार येथे २५ मार्च रोजी समोर आला. याप्रकरणी एका कापड दुकानदारावर बलात्कार, ॲट्रॉसिटीनुसार गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर दिलीप मोरे (३२, रा. राजपिंप्री, ह. मु. गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. त्याचे शहरात कापड दुकान आहे. शहरातील अहिल्यानगर येथील २९ वर्षीय महिला खरेदीसाठी त्याच्या दुकानात गेली होती. यावेळी कपडे दाखविण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर चहा पाजला व बिल तयार करून त्यावर लिहिण्यासाठी मोबाईल क्रमांक मागितला. पुढे वारंवार फोन करून ‘तुम्हाला महत्त्वाचे बोलायचे आहे, भेटायचे आहे’, असे सांगितले. त्यानंतर शासकीय आयटीआय परिसरात बोलावून ‘तुम्ही जेव्हापासून माझ्या दुकानात येऊन गेला, तेव्हापासून माझ्या स्वप्नात येता’, असे सांगून अंगाला झोंबाझोंबी केली. शिवाय अतिप्रसंगही केला. यानंतर नवीन बसस्थानकावर बोलावून घेत ‘तुझ्याशी लग्न करतो, तुझी मुले सांभाळतो’, असे सांगून बळजबरीने रिक्षात बसवून मादळमोही येथे नेऊन एका हॉटेलमधील लॉजवर अत्याचार केला.
जातीवाचक शिवीगाळ
पीडितेने लग्नाबाबत विचारल्यावर मोरे याने जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने घरी हा प्रकार सांगितला. दरम्यान, आरोपी फरार असून, उपअधीक्षक स्वप्नील राठाेड अधिक तपास करत आहेत.