राजकीय वादातून प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:13 AM2019-08-31T00:13:47+5:302019-08-31T00:15:03+5:30
तालुक्यातील घोडका राजुरी येथे दोन गटात राजकीय वाद विकोपाला गेलेले आहेत. याच वादातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटमुळे एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.
बीड : तालुक्यातील घोडका राजुरी येथे दोन गटात राजकीय वाद विकोपाला गेलेले आहेत. याच वादातून सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कमेंटमुळे एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
प्रवीण कैलास पवार (वय ३० वर्ष, रा. घोडका राजुरी ता.जी.बीड) असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. घोडका राजुरी येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रवीण हा शिवसंग्राम पक्षाच्या वतीने असलेल्या गटातून उभा राहिला होता. दरम्यान या गावामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष पुरस्कृत गटाचा विजय झाला होता. यामध्ये प्रवीण हा निवडणूक जिंकत तो ग्रा.पं.सदस्य झाला असल्याची देखील माहिती आहे.
मात्र, निवडणूक झाल्यापासून प्रवीण व घोडका राजूरीचे सरपंच तसेच इतर सदस्य यांच्यात अनेक वेळा वाद झाल्याची माहिती प्रवीण यांचे वडील कैलास यांनी दिली. तसेच याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालय, पिंपळनेर पोलीस ठाणे व मंत्रालयापर्यंत धमकी दिल्याप्रकरणी अर्ज केले आहेत. मात्र, कुठल्याही प्रकराची कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
या वादाला राजकीय पार्श्वभूमी असून, याच संदर्भात काही दिवसापुर्वी प्रवीण यांच्याविरुध्द विरोधी पक्षाताली सदस्यांनी अक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यामुळे त्याचा जाब प्रवीण यांनी विचारला होता. त्याचे संभाषण देखील रेकॉर्ड असल्याचे कैलास यांनी सांगितले. दरम्यान शुक्रवारी पोळा सण होता, त्यामुळे गावात धामधूम होती. त्यावेळी घोडका राजूरी परिसरात असलेल्या एका मिलजवळ कैलास याला गज, तलवार व दगडाने सात ते आठ जणांनी मारहाण केली तसेच पिस्तूल दाखवल्याचे कैलास यांनी सांगितले. यामध्ये प्रवीण हा गंभीर जखमी झाला होता. त्याला बेशुद्ध अवस्थेत पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आले होते. त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर प्रवीण याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. याप्रकरणानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी रुग्णालयात येऊन कैलास पवार यांचा जबाब नोंदवला.
यावेळी कैलास पवार यांनी सांगितल्यानूसार प्रवीण याच्यावर घोडका राजुरीचे सरपंच सचीन घोडके, पोपट घोडके, कल्याण पवार, मसु घोडके, अमोर वापर, बंटी पवार, बंटी जाधव व इतर संतोष नामक एका व्यक्तींनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.