विशेष पथके नेमून बिबट्याची दहशत तातडीने संपवा; पालकमंत्री मुंडे यांचे वन विभागाला निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:20 PM2020-11-25T12:20:07+5:302020-11-25T12:21:11+5:30
बिबट्याच्या हल्ल्यात मयत नागनाथ गर्जे यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने १५ लाख रुपयांची मदत जाहीर
कडा : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सुर्डी आणि परिसरात बिबट्याच्या वावर वाढल्याने दहशत पसरली आहे. वन विभागाने विशेष पथके स्थापून बिबट्याला तातडीने जेरबंद करून नागरिकांमध्ये पसरलेली भीती व दहशत तातडीने संपवावी असे निर्देश बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांना दिले आहेत.
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गर्जे हे मंगळवारी सायंकाळी शेतीला पाणी द्यायला गेले असता बिबट्याच्या हल्ल्यात जखमी होऊन मृत्युमुखी पडले होते. या परिसरातील बिबट्या जेरबंद करून दहशत लवकरच संपवण्यात येईल, याबाबत वन विभागाने युद्ध पातळीवर मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. तसेच बिबट्याचा वावर असल्याचे अनेक संदेश बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा अफवांमुळे वन विभागाची बऱ्याचदा दिशाभूल होते. तसेच ग्रामीण भागात भीतीचे वातावरण तयार होत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागास नागरिकांनी सहकार्य करावे. शेतकरी बांधवांनी त्यांची व पाळीव पशूंची काळजी घ्यावी असे आवाहनही पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.
गर्जे कुटुंबियांना १५ लाखाची मदत
शेतकरी नागनाथ गर्जे यांच्या मृत्यूबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केले आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या योजनेनुसार मयत गर्जे यांच्या कुटुंबियांना रोख पाच लाख रुपये व त्यांच्या पाल्यांच्या नावे मुदत ठेव (एफडी) दहा लाख असे एकूण १५ लाख रुपये देण्याचेही मुंडे यांनी जाहीर केले आहे.