लाच घेणाऱ्या सहायक निबंधकाला ३ वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:39 AM2021-09-15T04:39:26+5:302021-09-15T04:39:26+5:30
बीड : पाटोदा येथील इंदिरा रॉकेल वितरण व पुरवठा सहकारी संस्थेच्या अहवालासंदर्भात सहायक निबंधकाने १० हजारांची लाच घेतली ...
बीड : पाटोदा येथील इंदिरा रॉकेल वितरण व पुरवठा सहकारी संस्थेच्या अहवालासंदर्भात सहायक निबंधकाने १० हजारांची लाच घेतली होती. लाच घेताना त्याला औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. हे प्रकरण बीड येथील न्यायालयात सुरू होते. न्यायालयाने लाचखोर अधिकाऱ्याला दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली.
पाटोदा येथील इंदिरा रॉकेल वितरण व पुरवठा सहकारी संस्थेने २०११ साली संस्थेचा लेखापरीक्षण अहवाल दाखल न केल्याने त्यांना २३ सप्टेंबर २०११ रोजी संस्थेचा कारभार गुंडाळण्याबाबत अंतरिम आदेश सहायक निबंधक सुनील वाघमारे यांनी दिला होता. लेखापरीक्षण अहवाल दाखल केल्यानंतर अंतरिम आदेश रद्द करण्याची शिफारस करण्यासाठी सुनील वाघमारे यांनी या संस्थेचे चेअरमन शेख इसाक व शेख महेबूब यांना १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत शेख इसाक यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बीड येथे ११ एप्रिल २०१२ रोजी तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा होऊन आरोपीविरुद्ध त्याच दिवशी कारवाई झाली. औरंगाबाद येथील पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक वानखेडे यांनी सापळा रचून दहा हजार रुपये घेताना जालना रोडवरील निबंधक सहकारी कार्यालयासमोरील हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र त्यावेळचे उपअधीक्षक शिनगाडे यांनी दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. प्रमुख सत्र न्या. महाजन यांच्यासमोर प्रकरणातील युक्तिवाद होऊन आरोपी सुनील वाघमारे यास लाचप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. यात वाघमारे यास कलम ७ खाली एक वर्ष सक्तमजुरी व हजार रुपये दंड, कलम १३ (१) (ड) सह १३ (२) ला.लु.प्र.का. खाली ३ वर्षे सक्त मजुरी व हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ॲड. मिलिंद वाघिरकर यांनी बाजू मांडली. लाचलुचपत कार्यालय बीडतर्फे पैरवी नेहरकर यांनी केली.