एटीएम कार्डची अदलाबदल करून ७२ हजाराला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:35 AM2021-08-23T04:35:58+5:302021-08-23T04:35:58+5:30
माजलगाव : एटीएमच्या स्लॉटमधून पैसे काढून देतो असे म्हणत मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली ...
माजलगाव : एटीएमच्या स्लॉटमधून पैसे काढून देतो असे म्हणत मदत करण्याचा बहाणा करून हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदली करत दोघांना वेगवेगळ्या वेळी एकूण ७२ हजार रुपयांना गंडविण्यात आले. हा प्रकार शहरातील सावजी बँकेतील एटीएम मशीनवर शुक्रवारी दुपारी घडला. दरम्यान, हातचलाखी करून एटीएम बदलणारे दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
नारायण मारोती पोहेकर हे २० ऑगस्ट रोजी सिद्धार्थ पाईक यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी आले होते. दुपारी ३.२० वाजण्याच्या सुमारास डस्ट खरेदीसाठी लागणारे पैसे काढण्यासाठी ते सावजी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यांनी एटीएमच्या स्लॉटमध्ये कार्ड टाकून पैसे काढण्यासाठीची प्रक्रिया पुर्ण केली, परंतु पैसे निघाले नाहीत. त्यावेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या दोन व्यक्तींपैकी एकाने मी मदत करतो, पैसे काढून देतो म्हणत एटीएमच्या स्लॉटमधील कार्ड काढून घेतले. पापणी लवते न लवते तोच हातचलाखीने त्याच्या जवळचे सारखेच दिसणारे एसबीआयचे एटीएम कार्ड पोहेकर यांना दिले. नंतर पोहेकर यांनी संभाजी चौक येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्यांच्या मोबाईलवर एसबीआय बँकेचे आधी दहा हजार व नंतर दहा हजार रुपये काढल्याचे दोन वेगवेगळे मेसेज आले.
त्यामुळे पोहेकर यांनी त्यांच्या बचत खात्याबाबत बँकेत जाऊन तेथील मॅनेजरकडे खात्री केली. आपल्या खात्यावरील एकुण २० हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी खाते होल्ड करण्याची बँकेला विनंती केली. या प्रकरणी नारायण पोहेकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
एकाच दिवशी एकाच ठिकाणी दुसरा प्रकार मंजरथ रोडवरील श्रीराम भीमराव चव्हाण यांच्यासोबतही घडला. २० ऑगस्ट रोजीच दुपारी चार वाजता पत्नी निलावती चव्हाण यांचे कार्ड घेऊन ते सावजी बँकेच्या एटीएमवर गेले होते. परंतु, त्यांना पैसे काढता न आल्याने तेथे उभे असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला विनंती केली. त्या व्यक्तीने कार्ड एटीएममध्ये टाकून व्यवहाराचा प्रयत्न केला व खाते ब्लॉक असल्याचे सांगून चव्हाण यांचे एटीएम कार्ड हातचलाखीने स्वत:जवळ ठेवून तसेच दिसणारे दुसरे एटीएम कार्ड त्यांना परत दिले. दिलेले कार्ड सारखेच वाटल्याने चव्हाण दुसऱ्या एटीएमवर गेले. परंतु, दुसऱ्या एटीएमवर कार्ड बंद असलेले दिसून आले. थोड्या वेळाने मोबाईलवर ३२ हजार रुपये, तर २१ ऑगस्ट रोजी २० हजार रुपये काढल्याचे त्यांना मेसेज मिळाले. एकुण ५२ हजार रुपये हे भेटलेल्या त्या अनोळखी एका व्यक्तीने परस्पर काढून घेतले. अशा प्रकारे अनोळखी व्यक्तींनी दोघांना ७२ हजारास ठकविले.