लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास वीस वर्षे कारावास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 07:18 PM2023-10-09T19:18:11+5:302023-10-09T19:18:47+5:30
या प्रकरणाची तक्रार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दाखल होती
अंबाजोगाई: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आरोपीने महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत २० वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड, अशी शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी सोमवारी ठोठावली. दत्ता शिवाजीराव जाधव ( रा. वाघाळवाडी, ता. अंबाजोगाई) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, फिर्यादी महिलेस पूर्वीच्या लग्नातून एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहेत. तिची ओळख दत्ता जाधव याचे सोबत झाली. त्यादरम्यान तिचे प्रेम संबंध निर्माण झाले. त्यानंतर १० ते १२ वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये मुलाबाळांसह महिला जाधव सोबत अंबाजोगाई येथे राहत होती. दिनांक १९/०४/२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या सुमारास फिर्यादी भाजी विक्री करण्यासाठी बाजारात गेली होती. तेंव्हा फिर्यादीला दुपारी २.०० वा. च्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेच्या फोनवरून पिडीत अल्पवयीन मुलीने फोन केला व सांगितले की तू लवकर घरी ये असे म्हणून रडू लागली. तेव्हा फिर्यादीने विचारले असता, तिने सांगीतले की, मी व मोठा भाऊ घरी झोपलेलो असताना आरोपी दारु पिऊन आला व तो माझ्याजवळ येऊन झोपला , अश्लील चाळे करून अत्याचार केला.
फिर्यादी महिलेने या प्रकरणाची तक्रार अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात येथे दाखल केली. त्यानुसार आरोपी विरुद्ध कलम ३७६ (२) (1) भादवी सहकलम ४, ८, १२ पोस्को सहकलम ३ (१) (r) (s) (w), ३(२) (5) अ. जा. ज.अ.प्र. कायद्याअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.पोलिसांनी आरोपीस अटक केली.व त्याच्या विरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सदर प्रकरण सुनावणी साठी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालया समोर आले.
याप्रकरणात सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पिडीता व तीची आई यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणात सरकार पक्षाचा युक्तीवाद व साक्षपुरावा ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत विस वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रूपये दंड ठोठावला.या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. शिवाजी व्यंकटराव मुंडे यांनी बाजू मांडली. त्यांना अँड अशोक व्ही. कुलकर्णी, व अॅड. विलास एस. लोखंडे यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी म्हणून म्हणून पो. उपनिरीक्षक चंद्रकांत ठाकुर, सी. व्ही. फ्रान्सिस, गोविंद कदम यांनी सहकार्य केले.