मका फस्त केल्यानंतर ‘लष्करी अळी’चा हल्ला कापूस पिकावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:06 AM2019-10-06T00:06:14+5:302019-10-06T00:06:43+5:30
जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
बीड : जिल्ह्यात महत्त्वाचे पीक कापूस हे आहे. मात्र, मागील काही वर्षापासून कापसावर विविध संकट येत आहेत. दोन वर्षापासून सतत दुष्काळ, बोंडअळी व यावर्षी काही प्रमाणात लष्करी अळीचा प्रादर्भाव यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यावर्षी मका पिकावर असेले लष्करी अळीचे संकट मका फस्त केल्यानंतर कापूस या पिकावर येण्याची शक्याता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना केल्यास प्रादुर्भाव कमी होऊ शकतो असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केले आहे.
यावर्षी ३ लाख ७७ हजार ३५० हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड झाली आहे. दरम्यान लष्करी अळीचा प्रादुर्भाव हा सर्वात जास्त मका या पिकावर झालेला आहे. या किडीमुळे संपूर्ण पीक धोक्यात येते व नष्ट होते. ही कीड ज्वारी व तृणधान्य वर्गीय पिकांवर असते. मात्र, अनेक ठिकाणी मका पीक हे चाºयासाठी घेतले जात असल्याने कापसाच्या तुलनेत त्याची कापणी लवकर होते. कापूस पिकाच्या तुलनेत मका हे कमी कालावधीचे पिक असल्यामुळे त्याची काढणी लवकर होते. या दोन्ही गोष्टीमुळे मुख्य खाद्य पीक नष्ट झाल्याने लष्करी अळी आपला मोर्चा परिसरातील कापूस व इतर पार्यायी पिकांवर वळवण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे दुष्काळ व नापिकीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांपुढे लष्करी अळीचे नवीन संकट उभा राहिले आहे. मात्र, लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागाकडून विविध उपाययोजना सुचवण्यात येत आहेत. त्यामुळे प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होणार आहे.
या उपायायोजना कराव्यात
मका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या सहाय्याने मशागत करावी. त्यापुर्वी शेतातील मेटाराझीयम अनिसोप्ली अथवा नोमुरिया ५ ग्रॅम.प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. तसेच कापूस पिकावर ११.७ एस.सी.०.८ मिली. अथवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ एससी ०.३ प्रति लीटर पाणी या प्रमाणे त्वरित फवारणी करावी.
जैविक नियंत्रण : त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीयम अनिसोप्ली ५ ग्रॅम अथवा नोमुरिया रिलायी ५ ग्रॅम प्रति लीटर पाणी याप्रमाणे जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. सध्या वातावरण जैविक बुरशीच्या वाढीस अनुकूल असल्याने किडीचे परिणामकारक नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले.