भावकीच्या वादातून बाप-लेकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:10 AM2019-02-02T00:10:08+5:302019-02-02T00:10:29+5:30
भावकीत झालेला वाद विकोपाला जाऊन पाच जणांनी एका कुटुंबावर चाकू आणि लोखंडी गजाच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचा वार लागल्याने जखमी झालेल्या एका युवकाची प्रकृती गंभीर आहे.
बीड : भावकीत झालेला वाद विकोपाला जाऊन पाच जणांनी एका कुटुंबावर चाकू आणि लोखंडी गजाच्या साह्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चाकूचा वार लागल्याने जखमी झालेल्या एका युवकाची प्रकृती गंभीर आहे. ही घटना परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
येथील शेतकरी मोतीराम श्रीराम गुट्टे हे बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता शेतातून घराकडे जात असताना योगीराज श्रीराम गूट्टे, अनिल श्रीराम गुट्टे आणि अन्य तिघांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. याबद्दल माहिती मिळाल्याने मोतीराम यांची पत्नी लक्ष्मीबाई आणि मुलगा निलेश धावत तिथे आले. तेंव्हा हल्लेखोरांनी त्यांचा मोर्चा नीलेशकडे वळविला. सुंदर उत्तम गुट्टे याने आधी निलेशला ठार मारुत असे म्हणतच सर्वजण त्याच्यावर काठी, लोखंडी गज वार करत तुटून पडले. यावेळी अनिलने निलेशवर चाकूने वार केले. मुलाला वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई मध्ये पडल्या असता योगीराजची पत्नी सुनीताने त्यांचे केस ओढत नंतर त्यांना दगडाने मारहाण केली. तर योगीराजने मोतीराम यांना लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीत संपूर्ण कुटुंब जखमी झाले.
त्यापैकी निलेशवर करण्यात आलेले चाकूचे वार गंभीर असल्याने त्याची प्रकृती सध्या नाजूक असून त्याच्यावर परळी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मोतीराम गुट्टे यांच्या फिर्यादीवरून पाचही हल्लेखोरांवर परळी ग्रामीण पोलिसात गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला.
दरम्यान, याच घटनेत योगीराज गुट्टे यांच्या फिर्यादीवरून मोतीराम गुट्टे, पत्नी लक्ष्मीबाई आणि त्यांची मुले आत्माराम आणि निलेश यांच्यावर देखील मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास चालू आहे.