वीजचोरी रोखण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; एक कर्मचारी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 02:55 PM2020-11-28T14:55:54+5:302020-11-28T14:57:12+5:30
दर शनिवारी अकरा केव्ही लाईनची देखभाल व त्या लाईनवरील डीपीची पाहणी करण्यात येते.
केज : वीज चोरी रोखण्यास गेलेल्या महावितरणच्या पथकावर सोनीजवळा येथील कोकाटे वस्तीवर हल्ला करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांने डीपीतील फ्युज फेकून मारल्याने एक कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. जखमी कर्मचाऱ्यास उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
केज येथील ११ केव्ही लाईन सॅकलाईनवरील डीपी सातत्याने जळत आहे. यामुळे उपविभागामार्फत दर शनिवारी अकरा केव्ही लाईनची देखभाल व त्या लाईनवरील डीपीची पाहणी करण्यात येते. या डीपीवरुण वीज चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन करून कागदपत्रे घेतली जातात. आज सोनीजवळा येथे वीजवाहिनी व डीपीवरील अनधिकृत आकडे काढण्यास महावितरणचे सात जणांचे पथक गेले होते.
या पथकाने सोनीजवळा येथील भवानीनगरवरील गावठाण डीपीवरील आकडे व वायर काढले. त्यानंतर हे पथक कोकाटे वस्तीवरील ११ केव्हीच्या वीज वाहिनीची व तेथील डीपीची पाहणी करण्यास गेले. यावेळी थेटे आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याचे दिसताच पथकाने तेथील वायर काढले. याचा राग आल्याने एका शेतकऱ्याने पथकावर हल्ला केला. यावेळी डीपीतील किटकॅट फेकून मारल्याने दयानंद कावळे या कर्मचाऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली.