बीडमध्ये ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 04:55 PM2019-01-23T16:55:48+5:302019-01-23T16:57:34+5:30

चक्क ठाण्यात येऊन मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Attack on police officer at station in Beed | बीडमध्ये ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

बीडमध्ये ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

Next

बीड : ‘तु माझ्या मुलाला ठाण्यात का आणले’ या कारणावरून एकाने चार्ली पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यास ठाण्यात येत शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री १२ वाजता घडली. मारहाण करणारा आरोपी हा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे बोलले जात आहे. चक्क ठाण्यात येऊन मारहाण झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सुधीर शिंदे (४२ रा.केसापूरी परभणी ता.बीड) असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. २१ जानेवारी रोजी सचिन पवार या पोलीस कर्मचाऱ्याने सुधिरच्या मुलाला पकडले होते. त्याच्याविरोधात मुलींची छेड काढल्याची तक्रार होती. मित्र नगर भागात त्याला पकडल्यानंतर अवघ्या नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलाने पवार यांना अरेरावी केली. त्यामुळे त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. येथे त्याचे वय कमी असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याऐवजी नातेवाईकांना बोलावून घेत समज देण्यात आली. ही माहिती सुधीर शिंदे यालाही दिली होती. त्याने आपण बीडला आल्यावर हे प्रकरण पाहून घेऊ, असे पोलिसांना सांगितले होते.

दरम्यान, मंगळवारी शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सचिन पवार आणि खंडागळे हे दोघे गस्त घालत होते. रात्री ८ वाजेच्या सुमारास पवार यांना सधीर शिंदेचा फोन आला. त्याने पवार यांना शिवीगाळ केली. त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र माझा मुलगा छेड काढेल अन्यथा काही पण करेल, तुला काय करायचे, असे म्हणत अरेरावी केली. पवार यांनी त्याला ठाण्यात बोलावले. रात्री १२ वाजता पवार ठाण्यात येताच, तुच का पवार, असे म्हणत त्यांची कॉलर पकडली आणि मारहाण करण्यास सुरूवात केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून सोडवासोडव केली. हा प्रकार पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्या कानावर टाकला. त्यानंतर त्याला शहर पोलीस ठाण्यात हजर करून शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. सध्या तो शहर पोलिसांच्या ताब्यात आहे.

मद्यपान करून मारहाण
शिंदे हा ठाण्यात आला तेव्हा दारू पिलेला होता. पोनि पुरभे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्याने दारू पिल्याचा अहवाल तज्ज्ञांनीही दिला. दारू पिऊन ठाण्यात धिंगाणा घातल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पालकांनी जागरूक व्हावे
एखाद्या मुलीची छेड काढणे किंवा कोणाला विनाकारण त्रास देणे हे कायद्याने गुन्हा आहे. मुलीची तक्रार आल्यावर संबंधित मुलावर कारवाई करण्यासाठी पोलीस जातात. नंतर मोठा गुन्हा करू नये, यासाठी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात. मात्र काही पालक याचा नकारात्मक विचार करून अशा गोष्टींना आवर घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसते. त्यामुळे पालकांनी जागरूक रहावे.

आरोपीने मद्यपान केले होते 
ठाण्यात येऊन पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. बीड शहर पोलीस ठाण्यात संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने रितसर फिर्याद देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या ताब्यात आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असून त्याने मद्यपान केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे.
- शिवलाल पुरभे, पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड
 

Web Title: Attack on police officer at station in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.