वाळू माफियांकडून महसूल पथकावर जीवघेणा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:07 PM2018-05-05T17:07:05+5:302018-05-05T17:07:05+5:30
अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या आठ लोकांच्या पथकावर वाळू माफियांनी काठ्या-लाठ्यांसह दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला.
माजलगाव (बीड ) : अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या आठ लोकांच्या पथकावर वाळू माफियांनी काठ्या-लाठ्यांसह दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. ही घटना शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कवडगाव परिसरात घडली.
माजलगाव तालुक्यात वाळू माफियांचा सुळसुळाट आहे. अवैध वाळू उपसा करण्याबरोबरच वाहतूक केली जाते. याला प्रतिबंध करण्यासाठी माजलगाव पोलिसांसह महसूलच्या पथकाकडून वारंवार कारवाया केल्या जातात. शुक्रवारीही कवडगाव परिसरात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसील पथकाला मिळाली. जवळपास ८ ते १० जणांचे पथक कवडगाव येथे गेले. पथक कारवाईसाठी आल्यावर २५ ते ३० लोकांच्या जमावाने या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. काठ्या-लाठ्यांसह त्यांना मारहाणीचा प्रयत्न झाला. मात्र, पथकाने वाळू माफियांच्या तावडीतून सुटका करुन घेतली.
त्यानंतर माजलगाव पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर उप विभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह दाखल झाल्या. त्यांनी पथकाला धीर देत कारवाईचे आश्वासन दिले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्यांनी पोलीस तपासास सुरुवात केली. महसूलचे किती जणांचे पथक कारवाईसाठी गेले ? जाताना त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नियोजन केले होते का ? हल्लेखोर कोण आहेत ? याची माहिती घेण्यास नवटके यांनी सुरुवात केली होती. कोणालाही पाठीशी न घालता दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे नवटके यांनी सांगितले.