"छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले"; भुजबळांचा जरांगेंवर निशाणा, गोपीनाथ मुंडेंची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:53 PM2024-01-13T22:53:56+5:302024-01-13T22:54:49+5:30
स्व. गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते.
मुंबई - राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असता, उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यानंतर, ओबीसी समाजही आक्रमक झाला असून ओबीसींच्यावतीने ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वीच्या एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तर, जरांगे पाटील यांच्यावरही अनेकदा हल्लाबोल केला आहे. आता, बीडमधील मेळाव्यातूनही भुजबळ यांनी जरांगेंना लक्ष्य केलं.
स्व. गोपीनाथराव मुंडे आज असते तर ओबीसींचे हे सगळे प्रश्न निर्माण झालेच नसते. पण, ओबीसींच्या नशीबी हे दुर्दैव आलं आणि ओबीसींच्या संकटांची मालिका सुरू झाली, असे म्हणत भुजबळ यांनी बीडमधील एल्गार सभेत दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जागवल्या.
इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले. इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते मावळे म्हणजे भटके विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार समाजाचे होते. पण आता छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. छत्रपतींसाठी…
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 13, 2024
जे शांत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, पण जे आमच्या विरोधात काही लोकांना शक्ती देत आहेत त्यांना मात्र आम्ही विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा आपल्याला दाखवून द्यावी लागेल. हे जे चाललंय त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल, असे म्हणत भुजबळ यांनी काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधला. तसेच, बीडमधील जाळपोळीच्या घटनांचा संदर्भ देत, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्यावर हल्ले होत आहेत, असेही ते म्हणाले.
इतिहास असं म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज मराठा सैनिक घेऊन लढले. इतिहासात हेच नमूद आहे की छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांना घेऊन लढले. ते मावळे म्हणजे भटके विमुक्त, ओबीसी, बारा बलुतेदार समाजाचे होते. पण, आता छत्रपतींचं नाव घेऊन आमच्यावरच हल्ले केले जात आहेत. छत्रपतींसाठी जीवाची बाजी लावून लढवणाऱ्यांचीच आज घरं तुम्ही पेटवता? त्यांची लायकी काढता?, असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
अजितदादा फक्त एवढंच म्हणाले की मुंबईमध्ये मोठ्या संख्येने लोक आल्यानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडता कामा नये, एवढीच काळजी घ्या. तर त्यांच्याविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषा वापरली गेली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबाबत किती घाणेरडी भाषा वापरली गेली. इतका असंस्कृतपणा? एवढी मस्ती कुठून आली?, असा सवालही छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
मुस्लीम बांधवांचा सन्मान
बीडमधील क्षीरसागर कुटुंबियांच्या घरावर हल्ला झाला, त्यावेळी घरातील लहान मुलांना वसीम शेख, जलील अन्सारी, सत्तार शेख, अझीम शेख यांनी भिंतीवरून सुरक्षित बाहेर काढले. आपली धार्मिक प्रार्थना बाजूला ठेवून त्यांनी हे माणुसकीचं काम केलं. याबद्दल आज ओबीसी मेळाव्याच्या मंचावरून त्या सर्वांचा जाहीर सत्कार करण्यात आला.