घरगुती कारणावरून विवाहितेस सासरच्यांकडून पेटविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:31 AM2018-12-07T00:31:15+5:302018-12-07T00:32:05+5:30
घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत छळ करून पती, सासू आणि दिराने नंतर तिला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : घरगुती किरकोळ कारणावरून विवाहितेचा सतत छळ करून पती, सासू आणि दिराने नंतर तिला रॉकेल ओतून पेटविण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेकनूर येथे घडली. विवाहितेचा मोठा मुलगा बचावण्यासाठी पुढे आल्याने तिचा जीव वाचला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
शेख रहिमा शेख रशीद (वय २८, रा. नुरानी कॉलनी, नेकनूर) असे या पीडित विवाहितेचे नाव आहे. १३ वर्षापूर्वी तिचे लग्न शेख रशीद शेख दगडू याच्यासोबत झाले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्या पतीने सासू आणि दिराच्या सांगण्यावरून तिचा छळ सुरु केला. तिला सतत मारहाण करून उपाशी ठेवण्यात येऊ लागले. छळाला कंटाळून रहिमाने माहेर गाठले. त्यांनतर तिच्या माहेरच्या लोकांनी मध्यस्थी करून सासरच्या लोकांची समजूत घालून तिला परत पाठविले. त्यांनतर रहिमाला घरातच वरच्या मजल्यावर ठेवण्यात आले आणि तिचा संपूर्ण दैनंदिन खर्च माहेरहून होऊ लागला. तरीदेखील तिचा छळ सुरूच राहिला. २ नोव्हेंबर रोजी रहिमा तिच्या दोन मुलांना घेऊन झोपली असताना तिच्या पतीने तिला उठविले आणि केसाला धरून घराबाहेर काढले व मारपीट करून गळा दाबू लागला. यावेळी तिचा दीर आणि सासू यांनी प्रोत्साहन दिल्याने शेख रशीद याने भावाच्या हातातील कॅण्ड घेऊन रहिमाच्या अंगावर रॉकेल ओतले आणि काडी पेटविली. तो रहिमाला पेटविणार एवढ्यात तिचा १२ वर्षीय मुलगा वाचविण्यासाठी मध्ये पडला. ही संधी साधून रहिमाने तिथून पलायन करून स्वत:चा जीव वाचविला आणि थेट नेकनूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिला तातडीने बीडच्या रुग्णालयात दाखल केले असे रहिमाने फिर्यादीत नमूद केले आहे. उपचारानंतर बुधवारी तिने पोलीस ठाण्यात येऊन पती, सासू आणि दिरा विरोधात तक्रार दिली.