आरोग्य विभागाच्या जागेतच अतिक्रमणाचा प्रयत्न - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:02 AM2021-02-21T05:02:37+5:302021-02-21T05:02:37+5:30
कडा : आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे आरोग्य विभागाची जागा असल्याचे माहीत असूनही काही अज्ञातांनी याच जागेत खड्डे खोदून ...
कडा : आष्टी तालुक्यातील दादेगाव येथे आरोग्य विभागाची जागा असल्याचे माहीत असूनही काही अज्ञातांनी याच जागेत खड्डे खोदून अतिक्रमण करत शासकीय जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याप्रकरणी योग्य कारवाई करावी, अशी मागणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक व गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दादेगाव आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्राची इमारतीसह दहा गुंठे जागा आहे. मात्र, संरक्षक भिंत नसल्याने मोकळा परिसर आहे. याचाच फायदा घेत काही अज्ञातांनी बुधवारी या जागेत खड्डे खोदत जागेवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोग्य विभागाला समजताच तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. मोरे यांनी जागेची पाहणी केली. आरोग्य विभागाच्या जागेतच हे खड्डे खोदल्याचे लक्षात येताच तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक, गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करून या जागेत खड्डे खोदून अतिक्रमण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी डॉ. नितीन मोरे यांनी केली आहे.