मुलाला वाचण्याच्या प्रयत्नात आई आणि बहिणीचाही धरणात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 03:28 PM2019-03-19T15:28:21+5:302019-03-19T15:32:32+5:30
पोहता येत नसल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाला
माजलगाव (बीड ) : माजलगाव धरणातील पाण्यात कपडे धुताना मुलगा बुडत असल्याचे पाहून बहिण आणि आईने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने तिघांचाही बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजता घडली.
माजलगाव धरणात शहर व अकरा खेड्यांना पाणीपुरवठा करणारी एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या जवळ कपडे धुण्यासाठी एक महिला व तीन-चार मुळे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आली. यावेळी शेख सोहेल शेख नजीम ( ११) हा पाण्यात खेळत असताना खोल पाण्याकडे गेल्याने बुडू लागला. तो बुडत असल्याचे पाहून त्याची मावस बहीण शेख तबु शेख गफार (१४ ) हिने पाण्यात उडी घेतली.
भावाला वाचवण्याऐवजी तीच पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांना वाचविण्यासाठी सोहेलच्या आई शेख नसू शेख नामु (३० ) यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र, तळ्यातील पाणी खोल असल्याने व तिला पोहता येत नसल्याने तीदेखील पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. आजूबाजूला असलेल्या बालकांनी आरडाओरडा केल्यानंतर घटनास्थळी अनेकजण जमले. यानंतर या तिघांना बाहेर काढण्यात आले परंतु ते तिघे मृत झाले होते.
शेख नसू ही माजगाव शेजारी असलेल्या भाटवडगाव येथील शेख मोहम्मद यांची कन्या आहे. ती दोन दिवसांपूर्वीच औरंगाबाद येथून माहेरी आईवडिलांना भेटण्यासाठी आली होती