राख तळ्यात 'जिलेटीन ब्लास्ट'चा प्रयत्न; परळीतून आणखी एक आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 07:04 PM2022-08-30T19:04:24+5:302022-08-30T19:05:15+5:30
राख उपसा करण्यासाठी राखेचे घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे.
परळी (बीड): जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न तालुक्यातील दाऊतपुर शिवारातील राख तळ्यात केल्याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी आणखी एकास अटक केली. पोखराज सुखदेव गुजर ( रा. लोणी ता परळी मुळगाव राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी मजुरीने काम करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
राख उपसा करण्यासाठी राखेचे घट्ट झालेले ढीग मोकळे करण्यासाठी जिलेटिन वापरून ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आता अटक आरोपीची संख्या तीन झाली आहे. जिलेटीनच्या 103 कांड्या कुठून आणल्या, कोणी पुरविल्या, एवढा साठा आलाच कसा यापूर्वी राख तळे परिसरात ब्लास्टिंग कुठे कुठे झाली याचा शोध घेण्याचे आव्हान परळी ग्रामीण पोलीसा समोर आहे. दरम्यान, सोमवारी एटीएसच्या मुंबई, औरंगाबाद व बीड येथील अधिकाऱ्यांनी व बॉम्ब शोध व नाशक पथकाने भेट देऊन पाहणी केली आहे.
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राख तळ्यात दि 26 रोजी राख मोकळी करण्याकरिता जिलेटीन स्फोटके वापरत असल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांना काही जण आढळून आले. त्यानंतर परळी ग्रामीण पोलिसांनी ब्लास्टिंगच्या कामावर असणाऱ्या दोन मजुरांना अटक केली. तर ब्लास्टिंगचे काम करणाऱ्यास आज दुपारी पोलिसांनी अटक केली.