ग्रामदैवताच्या मंदिरासह जमीन बळकावण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:39 AM2021-09-04T04:39:41+5:302021-09-04T04:39:41+5:30
माजलगाव : शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन धर्मराज समाधी देवस्थानावर नाव लावून मंदिर आणि जमीन हडपण्यासाठी जातीचा व धर्माचा धाक ...
माजलगाव : शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन धर्मराज समाधी देवस्थानावर नाव लावून मंदिर आणि जमीन हडपण्यासाठी जातीचा व धर्माचा धाक दाखवून रवींद्र विठलराव ससाणे यांनी न.प.कडे नाव लावण्यासाठी अर्ज केला आहे, परंतु त्यास असंख्य भाविक भक्तांनी मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी आक्षेप घेत, योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
सिंदफणा नदीच्या काठावर शहराचे ग्रामदैवत असलेले पुरातन धर्मराज समाधी मंदिर व महालक्ष्मी अशी दोन मंदिरे आहेत. महसूल विभागाचे मंडळाधिकाऱ्यांनी ५ ऑगस्ट, २०१५ रोजी केलेल्या पंचनाम्यात धर्मराज समाधी मंदिर व महालक्ष्मी मंदिर अशी दोन मंदिरे दाखविली आहेत, तर २८ ऑगस्ट, २००६ रोजी माजलगाव तालुका भूमिअभिलेख अधिकाऱ्यांनी मोजणी करून, दिलेल्या नकाशात मंदिरे दाखविली आहेत. गट नंबर २२६ मधील सर्व्हे नंबर ३६९ मधील विठ्ठल दगडू ससाणे यांना शासनाकडून गायरान जमीन मिळाली होती, परंतु त्यांच्या वारसदार श्रीमती जिजाबाई विठ्ठल ससाणे, शिवकांत किशोर ससाणे, मिलिंद विठ्ठल ससाणे, रवींद्र विठ्ठल ससाणे यांनी २८ एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात शपथपत्राच्या आधारे करारनामा करून मिळालेली जमीन गट नं. २२६ सर्वे न.३६९ मधील २ एकर ०४ गुंठे जमीन श्याम धैर्यशील कदम, जयंत जनार्दन जाधव, संजय मनमोहनराव नलावडे, वसंत गणपत निवंगुणे यांना विक्री केली. त्यानंतर, त्यातील श्याम धैर्यशील कदम यांनी त्या जमिनीतील काही जमीन २ डिसेंबर, २०१७ रोजी संजय रामचंद्र जावळे यांना आणि १७ नोव्हेंबर, २०१७ रोजी अशोक कचरू जाधव यांना विक्री केली आहे. त्यामुळे या जमिनीवर रवींद्र विठ्ठल ससाणे यांचा काही संबंध राहिलेला नसताना, त्यांनी गट नंबर २२६ सर्वे नंबर ३६९ मधील धर्मराज समाधी देवस्थान व जमिनीवर नाव लावण्यासाठी अर्ज केला. त्यानुसार, मुख्याधिकाऱ्यांनी जाहीरनामा वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्यानंतर, या अर्जावर भाविक राजेभाऊ कुमावत, नगरसेवक प्रताप लाटे, सिद्धार्थ साळवे, रामेश्वर विठ्ठल जमदाडे, पत्रकार दत्ता येवले, रामचंद्र दराडे, नरेंद्र डुकरे, मारोती सावंत यांनी लेखी आक्षेप दिला आहे.