कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली तरच विवाह समारंभास उपस्थिती - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:32 AM2021-04-18T04:32:33+5:302021-04-18T04:32:33+5:30
अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल ...
अंबाजोगाई : वऱ्हाडी म्हणून विवाह समारंभास उपस्थित रहायचे असेल तर उपस्थित राहणाऱ्या वऱ्हाडी मंडळींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असेल तरच विवाह समारंभास उपस्थित राहता येईल, असा नवा नियम प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. विवाह सोहळ्यासाठी फक्त २५ जणांनाच परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे विवाह सोहळ्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नवीन नियमावलीप्रमाणे विवाह समारंभास फक्त २५ जणांचीच उपस्थिती राहणार आहे. विवाह समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या त्या २५ वऱ्हाडींना संबंधित पोलीस ठाण्याकडे विवाहासाठी उपस्थित राहणाऱ्या २५ जणांची यादी द्यावी लागणार आहे. या २५ जणांनी स्वत:ची कोरोना टेस्ट केलेली असावी व त्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला असावा. असे २५ जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट उपस्थितांच्या यादीसोबत जोडावयाचे आहेत.
केवळ वऱ्हाडी मंडळींनाच नाही तर ज्या ठिकाणी विवाह समारंभ साजरा होणार आहे, असे मंगल कार्यालय अथवा हॉटेल्समधील तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची अँटिजन अथवा आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. हॉटेल व मंगल कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही आपले स्वत:चे निगेटिव्ह रिपोर्ट व्यवस्थापनाकडे दाखवायचे आहेत. अशा निगेटिव्ह कर्मचाऱ्यांनाच समारंभाच्या ठिकाणी काम करता येईल. या सर्व नियमांचे पालन होते की नाही, यासाठी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन वऱ्हाडी मंडळींवर व मंगल कार्यालयाच्या व्यवस्थापनावर करडी नजर ठेवून आहेत. तसेच विवाह समारंभाच्या ठिकाणी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचनाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.