भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 12:54 PM2022-02-03T12:54:33+5:302022-02-03T12:54:43+5:30

टपरीचालक खून प्रकरणातील मुख्य आरोपी अभियांत्रिकीचा विद्यार्थी

attraction towards crime spolis education life, youth arrested in murder case | भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड

भाईगिरीच्या नादात भरकटली शिक्षणाची वाट, कुसंगत नडली अन गेला गजाआड

Next

- संजय तिपाले
बीड : वडील शिक्षक, घरात शिक्षणाचे वातावरण... मुलगा अभ्यासात हुशार.. पुण्याच्या चांगल्या महाविद्यालयात अभियांत्रिकीला प्रवेश मिळालेल्या प्रथमेश घुले याची फिल्मीस्टाईल भाईगिरीच्या नादात शिक्षणाची वाट भरकटली अन् तो पाहता पाहता खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकला. शहरातील टपरीचालक किशोर गुरखुदे खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींपैकी एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. शिक्षण घेऊन करिअर घडविण्याच्या वयात कारागृहात गेलेल्या चाैघांचा गुन्हे प्रवास ‘चलता है...’ म्हणत बेफाम वागणाऱ्या तरुणाईला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

युवराज देवावाले (रा. थिगळे गल्ली, बीड) हा व्यवस्थापक असलेल्या हॉटेलात १६ जानेवारी रोजी जेवणाचे बिल देण्यावरून वाद झाला होता. तो सोडविण्यासाठी युवराजने आपले मामा किशोर गुरखुदे (वय ४३, रा. जव्हेरी गल्ली) यांना बोलावले होते. यावेळी गुरखुदे यांच्यावर रॉड व लाकडी दांड्याने हल्ला केला होता. उपचारादरम्यान २३ जानेवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. वाद मिटविण्यासाठी आलेल्या किशोर यांना हकनाक आपला जीव गमवावा लागला.

कपिल जोशी (रा. पांगरी रोड, बीड), प्रथमेश घुले (रा. अंकुशनगर, बीड) , आतीश ऊर्फ लकी कंडेरे, आकाश कंडेरे या चौघांवर शिवाजीनगर ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद झाला. सुरुवातीला कपिल, नंतर प्रथमेशला बेड्या ठोकल्या, तर ३१ जानेवारी रोजी रात्री कपिलधार (ता. बीड) येथे डोंगर परिसरात लपून बसलेल्या आतीश व आकाश कंडेरे या भावंडांना उपनिरीक्षक बाळराजे दराडे, पो. ना. विष्णू चव्हाण, शिवनाथ उबाळे, सचिन आगलावे यांनी अटक केली.

गुन्हेगारी पार्श्वभूमी...
पोलीस सूत्रांनुसार, प्रथमेश घुलेवर बलात्कार, घरात घुसून मारहाणीचे दोन गुन्हे नोंद आहेत, तर कंडेरे बंधूंवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात ते नुकतेच जामिनावर सुटले होते.

चौघेही जिल्हा कारागृहात
या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली आहे. ३१ जानेवारी रोजी पकडलेल्या कंडेरे बंधूंची १ फेब्रुवारी रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. आता चौघेही जिल्हा कारागृहात आहेत. तीन आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड आढळून आले आहेत.
- बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक व तपास अधिकारी

सोशल मीडियात हिराेगिरी
आकाश कंडेरे व आतीश ऊर्फ लकी हे सख्खे भाऊ आहेत. महाराजा ग्रुप नावाने त्यांनी दीडशेवर तरुण जोडले होते. व्हॉट्सॲप ग्रुप काढून त्यात हिरोगिरी करणारे फोटो, व्हिडीओ शेअर करून प्रभाव पाडत, अशी माहिती उपनिरीक्षक बाळराजे दराडे यांनी दिली.

पालकांनी घ्यावी काळजी
आपला पाल्य मोबाइलवर काय पाहतो, त्याचे मित्र कोण, तो कोणासोबत राहतो, रात्री उशिरा येतो का, या बाबींकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. स्टेट्सला आक्षेपार्ह फोटो असतील, अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याला वेळीच समज द्यावी. कुसंगतीमुळे हुशार मुलेही कधी-कधी चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असते. तेव्हा पालकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.
- संतोष वाळके, उपअधीक्षक, बीड

Web Title: attraction towards crime spolis education life, youth arrested in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.