मालदार ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामसेवकात ‘लिलाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:36 AM2021-08-22T04:36:41+5:302021-08-22T04:36:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

'Auction' in Gram Sevak to get Maldar Gram Panchayat | मालदार ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामसेवकात ‘लिलाव’

मालदार ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामसेवकात ‘लिलाव’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : येथील पंचायत समितीचा कारभार कार्यालयातील वरिष्ठ सहायकच हाकत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. काही ग्रामसेवकांनी पैसे मोजून मालदार ग्रामपंचायतीत नेमणुका करून घेतल्याची माहिती समजली आहे. यासाठी ग्रामसेवकात लिलाव देखील झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ग्रामसेवकात ऐकायला मिळत आहे.

जो ग्रामसेवक जास्त पैसे मोजेल त्यास मोठी ग्रामपंचायत असे फर्मानच काढण्यात आले होते, अशा आशयाच्या तक्रारी ग्रामसेवकांनी केल्या आहेत. यामुळे मागील आठवड्यापासून अनेक ग्रामपंचायतींना ग्रामसेवक पोहोचले नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील दहा ग्रामसेवकांच्या बदल्या इतर तालुक्यात झाल्या होत्या. त्यांच्या जागी इतर तालुक्यातून दहा जण या ठिकाणी रुजू झाले. ते रुजू होताना त्यांना कोणती ग्रामपंचायत द्यायची याची खलबते सुरू झाली. ग्रामसेवकांना पसंतीची ग्रामपंचायत हवी असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले. नवीन ग्रामसेवकांना आर्थिक व्यवहारातून पाहिजे त्या ग्रामपंचायती दिल्या. त्या गावातील ग्रामसेवकांच्या देखील इतरत्र बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे जुन्या ग्रामसेवकांच्या काहीच तक्रारी नसताना त्यांच्या अचानक बदल्या झाल्याने सरपंच व नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले.

याबाबत नव्या व जुन्या ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मालदार ग्रामपंचायत पाहिजे असल्यास त्याचे दर ठरविण्यात आले होते. जो जास्त बोली लावेल त्यांना मोठी ग्रामपंचायत, असे ठरवण्यात आले. हा सर्व प्रकार पंचायत समितीतील वरिष्ठ सहायक करीत असल्याचेही ग्रामसेवकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व बदल्यांमुळे माजलगाव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. दरम्यान, तालुक्यातील घळाटवाडी, केसापुरी, फुलेपिंपळगाव, भाटवडगाव या मालदार गावांसाठी ग्रामसेवकात आता रस्सीखेच सुरू झाली आहे.

----------

बदलीमागे कोण?

ग्रामसेवकांच्या बदल्या केल्यानंतर अनेक सरपंच व ग्रामस्थांनी पंचायत समितीत जाऊन वरिष्ठ सहाय्यकांकडे बदल्यांबाबत विचारणा केली. आमदार साहेबांनी सांगीतल्यावरून आपण बदल्या केल्या असल्याचे ते सांगत होते. असे येथे चौकशी केलेल्या सरपंच, ग्रामस्थांनी सांगितले. ग्रामसेवकांच्या बदल्यांमागे केवळ वरिष्ठ सहाय्यकाच नसून त्यांना येथील वरिष्ठ अधिका-यांचे आशीर्वाद असल्याचीही चर्चा होती.

------

नवीन आलेल्या ग्रामसेवकांना गावांची माहिती नसल्यामुळे त्यांना इतर ग्रामसेवकांच्या जागी देण्यात आले आहे. यामुळे या बदल्यात आर्थिक व्यवहाराचा प्रश्नच उदभवत नाही.

-ए.एम.सिध्दीकी, वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, माजलगाव.

Web Title: 'Auction' in Gram Sevak to get Maldar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.