औरंगाबादच्या मुलाने बीडच्या अल्पवयीन मुलीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:41 PM2019-04-17T15:41:09+5:302019-04-17T15:41:51+5:30
यापूर्वीही औरंगाबाद पोलिसांनी घेतले होते ताब्यात
बीड : शिक्षणासाठी औरंगाबाद येथे असलेल्या अल्पवयीन मुलीस तेथील मुलाने आपल्या मैत्रिणीच्या मदतीने बीडमधून पळवून नेले. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यापूर्वीही या जोडप्याने पलायन केले होते. त्यावेळी औरंगाबाद शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आई-वडिलांच्या स्वाधीन केले होते.
सोनाली (वय १६ रा.बीड नाव बदलले) या मुलीला वडिलांनी शिक्षणासाठी औरंगाबादला ठेवले होते. अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणारी सोनाली दोनच महिने औरंगाबादला राहिली. त्यानंतर तिने औरंगाबादमधीलच गणेश (नाव बदललेले) मुलासोबत पलायन केले. औरंगाबाद पोलिसांना हे दोघेही संशयास्पद रित्या दिसले. त्यांनी दोघांनाही ताब्यात घेत आई-वडिलांना कळविले. मुलीच्या आई-वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर तिला बीडला आणले. तरीही हे दोघे फोनवरून बोलतच असावेत, असा संशय होता. यातूनच त्यांनी पुन्हा मंगळवारी सकाळी पलायन केले.
दरम्यान, गणेशने सोनालीला पळविण्यासाठी आपल्या एका मैत्रिणीचीही मदत घेतल्याचे समोर आले आहे. सोनालीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गणेश व तिच्या मैत्रिणीवर लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि महेश टाक हे करीत आहेत.
मोबाईलमध्ये सापडले फोटो
दरम्यान, सोनाली व गणेश या दोघांचे फोटो मोबाईलमध्ये सापडले होते. हाच प्रकार लक्षात आल्यानंतर सोनालीला औरंगाबादहून बीडला आणले होते. मात्र तरीही तिने घरच्यांची नजर चुकवून पलायन केल्याचे सांगण्यात आले. सध्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपासातून खरा प्रकार समोर येणार आहे.