ऑटोचालक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:47+5:302021-03-25T04:31:47+5:30
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर व परिसरातील शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प राहिली आहे. याशिवाय शहरात प्रवाशांची ...
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहर व परिसरातील शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प राहिली आहे. याशिवाय शहरात प्रवाशांची गर्दी नसल्याने व अनेक प्रवासी संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑटोरिक्षाचा वापर करत नसल्याने ऑटोचालक आर्थिक संकटात सापडले आहेत. परिणामी अॅटो खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडणेही अशक्य झाले असून अाॅटोचालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
थकीत विद्युत देयकांचा प्रश्न सुटेना
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात महावितरण कंपनीने वीजबिल वसुलीची मोहीम जोरदारपणे हाती घेतली आहे. कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करण्यात यावे. अशी मागणी विविध पक्ष व संघटनांकडून करण्यात आली होती. परंतु शासनाने या संदर्भात कसलीही सूट अथवा सवलत दिलेली नाही. जे ग्राहक वीजबिल भरणार नाहीत. त्यांचा विद्युत प्रवाह खंडित करण्याची मोहीम महावितरणच्या वतीने सुरू आहे. अजूनही काही पक्ष व संघटना वीजबिल माफीची मागणी करत असल्याने वीज ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
जनजागृती थंडावली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ या मोहिमेची जोरदार जनजागृती करण्यात येत होती. परंतु आता शाळा व महाविद्यालये बंद झाल्याने तसेच आरोग्य विभागाच्या पाठीमागे कोरोनाचा व लसीकरणाचा मोठा व्याप वाढल्याने विविध प्रकारचे जनजागृतीचे काम व विविध मोहिमा ठप्प झाल्या आहेत.
मास्कची सक्ती
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने बसस्थानकात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. गावोगावी जाणाऱ्या बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना मास्क असेल तरच बसमध्ये सोडले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षतेचा उपाय म्हणून प्रवाशांना मास्क वापरण्याबाबत सांगितले जात आहे. मास्क नसतील तर प्रवास करता येणार नाही. अशा सूचनाही प्रशासनाच्या वतीने दिल्या जात आहेत.
गृह विलगीकरणातील रुग्णांकडे विशेष लक्ष
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. मार्च महिन्यात कोरोनाचे मोठ्या संख्येने रुग्ण अंबाजोगाई शहर व तालुक्यात निघाले कोरोनाचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ज्या रुग्णांना त्रास नाही अशा रुग्णांना डॉक्टरांच्या सूचनेनुसार गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे अशा रुग्णांवर विशेष लक्ष आहे. अशी माहिती अंबाजोगाईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे यांनी दिली.