ऑटोचालकांनी ग्राहकांंना मास्क सक्तीचे करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:12 AM2021-09-02T05:12:36+5:302021-09-02T05:12:36+5:30
-------- कमी दाबाने वीज पुरवठा; शेतकरी त्रस्त अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने ...
--------
कमी दाबाने वीज पुरवठा; शेतकरी त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीज पुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने करून दिला तरच सिंचनाची गैरसोय दूर होईल.
-----------
आवास योजनेचे काम संथ गतीने
अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास तथा घरकुल योजनांचे काम संथ गतीने सुरू आहे. या योजनांच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून कामांना गती द्यावी. लाभार्थ्यांची नोंदणी सक्षम पद्धतीने करावी. आजही अनेक लाभार्थी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या चांगल्या योजनेपासून वंचित आहेत. त्या लाभार्थ्यांना योग्य न्याय द्यावा. त्यांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी रिपाइंच्या महिला आघाडीच्या जिल्हा सचिव राणी गायकवाड यांनी केली आहे.
-----------
वीट निर्मितीची कामे वेगात
अंबाजोगाई : अंबाजोगाई व परिसरात वीट निर्मितीच्या कामाला मोठा वेग आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात वीटभट्ट्या बंद असल्याने त्यांना चांगलाच फटका बसला होता. आता पुन्हा बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू झाल्याने विटांची मागणी वाढली आहे. शहरी भागात विटा निर्मितीच्या कामांना मोठा वेग आला आहे. त्यामुळे विटा निर्मितीवर काम करणाऱ्या मजुरांना दिलासा मिळाला आहे.
--------
संगणक परिचालकांच्या मागण्या प्रलंबित
अंबाजोगाई : महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनांकडून वारंवार केल्या जाणाऱ्या मागण्यांकडे राज्य शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे संगणक परिचालक संकटात सापडले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
--------------
मोकाट जनावरांचा रस्त्यावरच ठिय्या
अंबाजोगाई : शहरातील सावरकर चौक ते शिवाजी चौक या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसलेली असतात. रस्त्याच्या मधोमध ही जनावरे बसत असल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ व जनावरांंचा ठिय्या यामुळे वाहतूक व्यवस्था अनेकदा कोलमडते. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन जनावरांंना रस्त्यातून हटवावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
----------
लघू प्रकल्पांची दुरुस्ती रखडली
अंबाजोगाई : जिल्हा परिषद जलसंधारण विभागाच्यावतीने अंबाजोगाई तालुक्यातील अनेक लघू प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. अनेक छोटी व मोठी कामे या माध्यमातून व्हावीत. अनेक प्रकल्पांना गेट बसवणे, गेटची दुरुस्ती अशा कामांसाठी निधींची मागणी करण्यात आली; मात्र अद्यापही निधी प्राप्त न झाल्याने दुरुस्तीची कामे रखडली आहेत.
---------------------
महावितरण बिलाचा ग्राहकांना शॉक
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणकडून दिली जाणारी बिले अव्वाच्या सव्वा प्रमाणात देण्यात आली आहेत. कोणत्याही विद्युत पंपाला मीटर नसल्याने देण्यात येणारी बिले अंदाजाने देण्यात येतात; मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कमी व्हॉर्स पॉवरच्या विद्युत मोटारी आहेत. अशा शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात वीज बिले आली आहेत. महावितरणच्या या वीजबिलाच्या शॉकने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.