बीड बसस्थानकातील गलिच्छ कँटीनला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 11:55 PM2019-08-08T23:55:38+5:302019-08-08T23:56:34+5:30
बसस्थानकातील कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करुन विक्री करण्यात येत होते.
बीड : बसस्थानकातील कॅन्टीनच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता तसेच नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल, अशा प्रकारे अन्नपदार्थ तयार करुन विक्री करण्यात येत होते. याप्रकरणी अन्न औषध प्रशासनाने बुधवारी कारवाई करीत बसस्थानकातील कॅन्टीनला टाळे ठोकले आहे. जोपर्यंत सुधारणा केली जात नाही तोपर्यंत कॅन्टीन बंद राहणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त के. एन. दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, अनिकेत भिसे यांनी बसस्थानकातील कॅन्टीनची तपासणी केली. यावेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आढळून आली. तसेच आरोग्यास हानीकारक असे अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे त्यांना दिसले. अन्न पदार्थ हाताळताना घ्यावयाची काळजी, तेथे असलेल्या कामगारांकडून घेतली जात नव्हती. तसेच स्वयंपाकघरामध्ये मोरीच्या पाईपमधून उंदीर, घूस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील यावेळी निदर्शनास आले. त्याचबरोबर नाली उघड्यावर असून, तेथेच स्वयंपाक केला जात असल्याचे दिसून आले. भाज्या बनविण्यासाठी लागणारे साहित्य अस्वच्छ आढळून आले. शुध्द पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था येथे नव्हती. तसेच कॅन्टीनमधील खिडक्या व स्वयंपाकघरात जळमटे दिसून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो ही कारणे नमूद करीत जोपर्यंत नियमानुसार सर्व बाबी तयार केल्या जात नाहीत तोपर्यंत कॅन्टीन बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या होत्या तक्रारी
बसस्थानकातील कॅन्टीनमध्ये प्रवासी तसेच शहरातील नागरिक अनेक वेळा खानपानासाठी जातात.
मात्र, तेथे असलेल्या अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी नागरिकांनी अन्न औषध प्रशासनाकडे केलेल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेत बुधवारी ही कारवाई करण्यात आली. तसेच इतर ठिकाणी देखील अशा प्रकारे अस्वच्छता आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन अन्न औषध प्रशासन सहायक आयुक्त के.एन. दाभाडे यांनी केले.