लसीकरणासाठी माहिती देण्यास खासगी रुग्णालयांकडून टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:26+5:302020-12-24T04:29:26+5:30
बीड : जिल्ह्यातील खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. याची माहिती संकलित करण्याचे काम ...
बीड : जिल्ह्यातील खाजगी व शासकीय आरोग्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. याची माहिती संकलित करण्याचे काम गतीने सुरू आहे. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २३१ रुग्णालयांनी माहितीच दिली नसल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जिल्हाधिकाऱ्यांनी नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यासंदर्भात नोटीसही बजावली. परंतु, यालाही त्यांनी केराची टोपली दाखविली आहे.
कोरोनाकाळात आरोग्य विभागाने सर्वात पुढे होऊन काम केले आहे. त्यामुळे कोरोना लस देण्यासाठी त्यांना प्राधान्य दिले आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील खासगी व सरकारी आरोग्य संस्थेत कार्यरत डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली होती. शासकीय संस्थांमधील १०० टक्के माहिती संकलित झाली आहे. परंतु, जिल्ह्यातील ६३४ पैकी ४०३ रुग्णालयांनी माहिती दिली आहे. अद्यापही २३१ रुग्णालयांनी माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, ज्या खासगी रुग्णालयांनी माहिती दिली नाही, त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली होती. यात रजिस्ट्रेशन रद्द करण्याचाही इशारा दिला होता. परंतु, प्रशासनाचा वचक नसल्याने अद्यापही २३१ खासगी रुग्णालयांनी या नोटीसला केराची टोपली दाखविली आहे. आता खरोखरंच प्रशासन यावर काय कारवाई करते, हे वेळच ठरविणार आहे.
कोट
जिल्ह्यातील ६३४ खाजगी रुग्णालयांपैकी ४०३ रुग्णालयांनी माहिती दिली आहे. अद्यापही २३१ रुग्णालये माहिती देणे बाकी आहेत. त्यांनी लवकरात लवकर माहिती देऊन सहकार्य करावे.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड