वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभार घेण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:09+5:302021-05-20T04:36:09+5:30
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सात दिवस चोवीस तास सुविधा असलेले गंगामसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ...
गंगामसला : माजलगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सात दिवस चोवीस तास सुविधा असलेले गंगामसला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र शोभेची वास्तू ठरत आहे. या आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय आधिकाऱ्यांची नियुक्ती असताना कुणीच पदभार स्वीकारत नसल्याने आरोग्य केंद्राचे नियोजन कोलमडले आहे. याबाबत उच्चपदस्थ भूमिका घेण्यात कुचराई करीत असल्याने आरोग्य केंद्राचा कारभार चर्चेत आला आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत महामार्गासह ४२ हजार लोकसंख्येसह ३५ गावे येतात. या प्राथमिक केंद्रात बाह्यरुग्णांची गर्दी होते. परंतु, जिल्हा आरोग्य प्रशासन व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे नियोजन कोलमडले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत रुग्णांची हेळसांड होत आहे.
वैद्यकीय अधिकारी डाॅ. संतोष गुंजकर यांची बदली झाल्यापासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन महिन्यांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप बटुळे यांना पदभार घेण्यासाठी आदेशित केले होते. मात्र, त्यांनी अजूनही पदभार घेतला नाही. वैद्यकीय अधिकारी पदभार घेत नसल्याने व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे आरोग्य केंद्रात वीज पुरवठा खंडित झालेला आहे, तो सुरळीत करण्यासाठी अडचणी येत आहेत. पिण्यासाठी पाणी नाही, बाथरूमची व संडासची व्यवस्था नसल्याने महिला कर्मचाऱ्यांची हेळसांड होत आहे. दर महिन्याला होणारी गर्भवती महिलेची तपासणी वेळेवर होत नाही, त्यांना दिवसभर ताटकळत आरोग्य केंद्रात बसावे लागत आहे. रुगणवाहिका डिझेलअभावी बंद आहे. असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हा आरोग्य प्रशासनाने यात लक्ष घालून परिस्थिती पूर्वपदावर आणावी अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.
गंगामसला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी पदाचा कार्यभार देण्यासंबंधी प्रयत्न केला होता; परंतु काही डाॅक्टरांनी असमर्थता दर्शविली होती. आता पुन्हा याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसांत पदभार अधिकाऱ्यांकडे देण्यात येईल. - डाॅ. मधुकर घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी, माजलगाव.
अधिकारी कार्यतत्पर असतील तर सर्व कर्मचारी व सुविधांचे नियोजन योग्य प्रकारे होते; परंतु अधिकारीच उदासीन असल्यामुळे आरोग्य विभागाच्या व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचा नमुना हा आपण गंगामसला आरोग्य केंद्राच्या रूपाने पाहू शकतो. - आप्पासाहेब जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख, माजलगाव.
===Photopath===
170521\5610img_20210517_115619_14.jpg