कमालच! शेतकऱ्याने दीड एकरावर महाकाय विहीर खोदून केली दुष्काळावर मात,१० कोटी लिटर पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 02:01 PM2022-04-07T14:01:26+5:302022-04-07T14:23:13+5:30
सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते.
- सखाराम शिंदे
गेवराई (जि. बीड) : कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी-कधी अवकाळी.. यामुळे शेती व्यवसायाला जुगार खेळण्याजोगेच मानले जाते. मात्र, तालुक्यातील पाडळसिंगी येथे दीड एकरात विहीर खोदून राज्यात चर्चेत आलेले मारुती बजगुडे हे तीन वर्षे दुष्काळ पडला, तरी ५० एकर शेती हिरवीगार करू शकतात. १० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता असलेली महाकाय विहीर खोदून त्यांनी कोरड्या दुष्काळावर कायमची मात केली आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या बीडमध्ये होतात. निसर्गाच्या अवकृपेमुळे ही शेती तोट्यात चालली आहे. पाऊस कमी पडला तरी शेती पडीक राहू नये म्हणून शेतकरी आगळेवेगळे प्रयोग करीत आहेत. असाच एक प्रयोग पाडळसिंगी येथील मारोती बजगुडे यांनी केला. यांची १२ एकर शेती आहे. सोबतच त्यांचा मंडपाचा व्यवसाय असून, सतत दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पन्नात घट होत असल्याने बारामाही पाणी पुरेल, अशी काहीतरी योजना आखण्याचे त्यांच्या डोक्यात होते. शेततळ्याचा विचार केला मात्र त्यामध्ये मर्यादित पाणीसाठा राहतो, त्यामुळे त्यांनी आपल्या दीड एकर शेतामध्ये विहीर करण्याचे ठरवले. मात्र, सुरुवातीला यासाठी अनेक अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करीत त्यांनी तीन वर्षांपूर्वी विहीर खोदण्यास सुरुवात केली.
या विहिरीतून निघालेला मुरुम त्यांनी महामार्गासाठी दिला. त्यातून त्यांना २० लाख रुपये मिळाले. काहीही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निश्चय मनाशी धरून त्यांनी काम सुरू ठेवले. विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी साडेपाच परस खोलवरून सिमेंटने सर्व बाजूने कडे टाकले. या कामासाठी सहा महिने दररोज ८० मजूर राबत होते. शिवाय माती व दगड काढण्यासाठी १० ट्रक लावले होते.
मत्स्यपालनाचे नियोजन
दरम्यान, दुरून पाहिल्यानंतर या ठिकाणी एखादे धरण किंवा तलाव असल्याचा भास होतो. १० हजार कोटी लीटर क्षमतेची महाराष्ट्रातील ही एकमेव विहीर असून, बजगुडे यांनी आपल्या १२ एकरपैकी ८ एकरात मोसंबीची लागवड केली आहे. तसेच या विहिरीमध्ये माशांचे बीजारोपण करण्यात आले असून, या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचा त्यांना मानस आहे.
आता उत्पन्न वाढेल
सततच्या दुष्काळाला कंटाळून विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. विहिरीचे काम सुरू केले तेव्हा महाकाय विहीर खोदणे शक्य होईल का? अशी शंका होती. पण, अडचणींवर मात करीत काम पूर्ण झाले. यामुळे आता सलग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी पाण्याची चिंता नाही. शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड दिल्याने उत्पन्न वाढेल, असा विश्वास आहे.
- मारोती बजगुडे, शेतकरी, पाडळसिंगी (ता. गेवराई)