खाजगी रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले; ऑडिट केवळ सहा रुग्णालयांचेच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:28+5:302021-04-16T04:34:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयांकडून लाखोंच बिले आकारली जात आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. खाजगी रुग्णालयांकडून लाखोंच बिले आकारली जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून ऑडीट करण्यास आखडता हात घेतला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ५४ खाजगी रुग्णालयांना कोवीड सेंटरची परवानगी दिलेली आहे. परंतु, सर्वात अगोदर परवानगी दिलेल्या केवळ ६ रुग्णालयांचेच ऑडीट झाल्याची माहिती समोर आली आहे. इतर रुग्णालयांकडे अद्यापही दुर्लक्ष होत असून याची माहिती देण्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातून टाळाटाळ केली जात आहे.
मागील काही दिवसांपासून बाल, स्त्री रुग्णालयांचेही कोवीड सेंटरमध्ये रुपांतर केले जात आहे. असे असले तरी रुग्णांच्या गर्दीने अवघ्या काही तासांत ही रुग्णालये हाऊसफुल्ल हाेत आहेत. रुग्णांची गरज पाहता त्यांच्याकडून हे खाजगी रुग्णालये नियम डावलून लाखोंची बिले वसूल करीत असल्याचे दिसते.
नऊ लाख रुपये अद्यापही परत करणे बाकी
सुरुवातीच्या काळात ज्या रुग्णालंयाचे ऑडीट झाले होते, त्या रुग्णालयांनी शासकीय दरांपेक्षा सुमारे १४ लाख रुपये रुग्णांना अधिकचे आकारले होते. दरम्यान, आतापर्यंत यातील केवळ ४ लाख ८५ हजार रुपये या रुग्णालयांनी रुग्णांना परत केलेे असून ९ लाख रुपये अद्यापही परत करणे बाकी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
माहिती देण्यास टाळाटाळ
खाजगी रुग्णालयांचे ऑडीट करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयाची आहे. यासाठी स्वतंत्र समितीही गठीत केलेली आहे. याची माहिती विचारली असता संबंधित लेखापालाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. यावरुन यात सावळा गोंधळ असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
खाजगी रुग्णालयांतील सूविधा व सेवांबाबत तपासणी करण्याकडे दुर्लक्ष
खाजगी रुग्णालयांकडून लाखोंची बिले वसूल केली जात आहेत. परंतु, त्या तुलनेत त्यांना सुविधा व आरोग्य सेवा मिळतात का, शासनाच्या नियमांचे पालन होते का, याची तपासणी करण्याकडे आरोग्य विभाग व प्रशासन ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
लाखाच्याखाली कोणाचेही बिल नाही
कोराेनाचा कहर वाढत असल्याचे पाहता शासनानेच खाजगी रुग्णालयांना दर निश्चित करुन दिले. असे असले तरी बीडमधील बहुतांश रुग्णालयांनी लाखोंची बिले वसूल केली. आजही बाधितांना १० दिवस उपचार करुन त्यांच्याकडून लाखाच्या जवळपास बिलाच्या स्वरुपात वसुल केले जात आहेत. असे असले तरी प्रशासनाकडून मात्र, ऑडीटमध्ये घोळ करुन त्यांना अभय दिले जात असल्याचा आरोप आहे.