डीएनए चाचणीसाठी घेतले त्या बाळाच्या रक्ताचे नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:12 AM2018-05-24T01:12:00+5:302018-05-24T01:12:00+5:30
: मुल अदलाबदल प्रकरणात पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब बुधवारी नोंदविले आहेत. तर सायंकाळच्यावेळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले जाणार होते. दरम्यान, पायाचे ठसे घेतल्यानंतर बुधवारी त्या बाळाचे डीएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अॅसिड) नमुने तपासणीसाठी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मुल अदलाबदल प्रकरणात पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब बुधवारी नोंदविले आहेत. तर सायंकाळच्यावेळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविले जाणार होते. दरम्यान, पायाचे ठसे घेतल्यानंतर बुधवारी त्या बाळाचे डीएनए (डीआॅक्सीरिबोन्यूक्लिकाईक अॅसिड) नमुने तपासणीसाठी घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. या प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत असून सर्वचजण संशयाच्या भोवऱ्यात आहेत.
छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने ११ मे रोजी सायंकाळी ४.४५ वाजता मुलाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले. परंतु येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली. त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बसस्थानकासमोरील श्री बाल रूग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी मात्र मुलाऐवजी मुलगी अशी नोंद केली. त्याच्यावर दहा दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करीत बाळ स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली होती.
दरम्यान, बुधवारी शहर पोलिसांनी जिल्हा रूग्णालयातील तीन डॉक्टर व तीन परिचारीकांचे जबाब घेतले आहेत. यामध्ये त्यांनी बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला औरंगााबदला हलविण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. तर सायंकाळी खाजगी रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांचे जबाब नोंदविणार असल्याचेही पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान म्हणाले.
बाळावर जिल्हा रूग्णालयात उपचार
नातेवाईकांनी त्या बाळाला स्विकारण्यास नकार दिल्याने पोलिसांनी ते बाळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे त्याला अतिदक्षता विभागात ठेवले असून त्यावर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिले आहेत. तसेच पोलिसांच्या मागणीप्रमाणे बाळाचे डीएनए तपासणीसाठी दिल्याचेही ते म्हणाले.