प्रसुतीवेळी स्त्री रोगतज्ज्ञ नसल्याने बाळ दगावले, नातेवाईकांकडून रूग्णालयाची तोडफोड
By सोमनाथ खताळ | Published: August 16, 2023 07:44 PM2023-08-16T19:44:59+5:302023-08-16T20:54:08+5:30
प्रकरण दडपले राजकीय दबाव; कनूरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयातील प्रकार
बीड : तालुक्यातील नेकनूर येथील स्त्री व कुटीर रूग्णालयात तब्बल सहा स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. पंरतू प्रसुतीच्यावेळी एकही हजर नसल्याने एका महिलेचे बाळ दगावले. ही घटना ५ ऑगस्ट रोजी पहाटे ६ वाजता घडली. यावेळी नातेवाईकांनी आक्रमक होत रूग्णालयाची तोडफोड केली. याची अत्यंत गोपनियता पाळत स्थानिक व राजकीय पुढाऱ्यांनी हे प्रकरण दडपण्यात आले. परंतू वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या अहवालानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे.
२१ वर्षीय महिला (रा.बंदेवाडी ता.केज) या ५ ऑगस्ट रोजी १२ वाजता नेकनूरच्या स्त्री व कुटीर रूग्णालयात दाखल झाल्या. ॲडमिट झाल्या तेव्हा डॉक्टरांनी तपासून प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. ५ वाजताही तपासणी केली तेव्हा बाळाचे ठाेके आणि मातेची प्रकृती स्थिर होते. परंतू सहा वाजता मातेला कळा सुरू झाल्या. परंतू प्रसुतीसाठी रूग्णालयात एकही स्त्री रोग तज्ज्ञ हजर नव्हते. त्या दिवशी ड्यूटीवर असणाऱ्या डॉ.सोनम जायभाये या देखील उशिरा आल्या. तोपर्यंत परिचारीकांनी प्रसुती केली परंतू बाळ मयत जन्माला आले.
ही बातमी समजताच नातेवाईकांनी रूग्णालयातील काचांची तोडफोड केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. परंतू काही राजकीय पुढारी आणि डॉक्टरांनी नातेवाईकांवर दबाव आणत तक्रार देण्यापासून परावृत्त केले. त्यामुळे हे प्रकरण दडपले. परंतू याच रूग्यालयातील डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सकांनी अहवाल दिला असून त्यानंतर याला वाचा फुटली आहे. आता याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कोण काय म्हणतंय...
याबाबत नेकनूरच्या कुटीर रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशिलाक शिंदे यांनी फोन घेतला नाही. स्त्री रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक हुबेकर म्हणाले, याचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे. स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सोनम जायभाये म्हणाल्या, मी त्या दिवशी कॅम्पसमध्येच होते. वैद्यकीय दृष्ट्या असे प्रकार क्वचितच घडतात. सुरूवातीला सगळे काही चांगले असताना शेवटच्या क्षणी असे काय घडले, हे आम्हाला पण समजले नाही. असे काही होईल, म्हणून वाटले पण नव्हते. परंतू यात हलगर्जी झालेली नाही, असे सांगितले.
स्त्री रूग्णालयातच सुविधांचा अभाव
नेकनूरमध्ये महिलांना सर्व सेवा मिळाव्यात, यासाठी स्त्री व कुटीर रूग्णालय तयार केले. हे दोन्ही रूग्णालय एकाच इमारतीत सुरू आहेत. येथे सहा स्त्री रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन असे अधिकारी काम करतात. असे असतानाही येथे वेळेवर व तत्पर सेवा दिल्या जात नसल्याने मृत्यू होत आहेत. यापू्र्वीही हे रूग्णालय वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा येथील गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.