नेकनूरच्या रूग्णालयात बाळ दगावले; डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार
By सोमनाथ खताळ | Published: August 22, 2023 06:20 PM2023-08-22T18:20:44+5:302023-08-22T18:20:58+5:30
चौकशी समितीने दिला अहवाल : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष
बीड : नेकनूर स्त्री व कुटीर रूग्णालयात एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात समितीने चौकशी करून अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केला आहे. यात अनेक मुद्दे नोंदविण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यातील डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार असून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
नेकनूरच्या रूग्णालयात ५ ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील एका महिलेची प्रसुती झाली होती. या रूग्णालयात पाच स्त्री रोग तज्ज्ञ असतानाही वेळेवर एकही हजर नव्हते. त्यामुळे परिचारीकेने प्रसुती केली. यात बाळ दगावले. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले आणि रूग्णालयाीच तोडफोड केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी समिती नियूक्त करण्यात आली होती. १९ ऑगस्ट रोजी समितीने नेकनूरमध्ये जावून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सोनम जायभाये, बालरोगतज्ज्ञ डॉ.शंकर काशीद, परिचारीका एस.गायकवाड आणि कक्षसेवक यांचे जबाब घेतले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी या प्रकरणाचा आठ पानी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालात अनेक मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. यावरून डॉक्टरांचा दोष असल्याचे सिद्ध होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आता या प्रकरणात सीएस डॉ.चव्हाण काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.
कारवाई की क्लिनचिट?
नेकनूरच्या प्रकराचा अहवाल आपल्याकडे आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी दिली आहे. आता या अहवालावरून डॉ.चव्हाण कारवाई करतात की क्लीनचिट देतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आठ पानांचा चौकशी अहवालही हाती लागला असून जर क्लिनचीट दिली तर स्त्री रोग तज्ज्ञांचा बचाव करण्याच्या नादात सीएसच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कारवाईकडेही लक्ष लागले आहे.