पक्ष प्रवेशानंतर १५ दिवसांतच बजरंग सोनवणेंना उमेदवारी; निष्ठावंतांच्या ठरावाचे काय ?
By सोमनाथ खताळ | Published: April 10, 2024 11:07 AM2024-04-10T11:07:25+5:302024-04-10T11:13:53+5:30
निष्ठावंतांच्या उमेदवारीसाठी ठराव घेणारेच करताहेत स्वागत अन् प्रचार
बीड : बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून दि. २० मार्चला सायंकाळच्या वेळी शरद पवार गटात प्रवेश केला. दि. २३ मार्चला केज विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तातडीची बैठक घेत लोकसभा निवडणुकीसाठी निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव घेतला. परंतु प्रवेशानंतर १५व्या दिवशीच म्हणजेच ४ एप्रिलला बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे दि. २३ मार्चच्या बैठकीत घेतलेल्या निष्ठावंतांच्या ठरावाचे काय झाले? असा प्रश्न आहे. विशेष म्हणजे ज्यांनी ठराव घेतला, तेच आता सोनवणेंचा सत्कार आणि प्रचार करताना दिसत आहेत.
बीड लोकसभा निवडणूक ही सध्या तरी तिरंगी होण्याच्या मार्गावर आहे. महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनीही आपण लोकसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. परंतु अद्यापही त्यांनी अपक्ष लढणार की कोणत्या पक्षाची मदत घेणार? हे स्पष्ट केलेले नाही. जर डॉ. मेटे यादेखील मैदानात उतरल्या तर बीडमध्ये चौरंगी लढत होऊ शकते. दरम्यान, निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. बीड जिल्ह्यात १८ एप्रिलपासून प्रक्रियेला सुरुवात होईल. १३ मे रोजी मतदान होऊन, ४ जून रोजी बीड जिल्ह्याचा खासदार निश्चित होणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
अंबाजोगाईच्या बैठकीत काय घेतला ठराव?
दि. २३ मार्च रोजी केज व अंबाजोगाई तालुक्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अंबाजोगाईत बैठक घेतली. लोकसभा व केज विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाप्रती निष्ठा असलेल्या निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी, असा एकमताने ठराव घेण्यात आला. यावर केज विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटील, डॉ.नरेंद्र काळे, माजी आ. पृथ्वीराज साठे, व्यंकटेश चामनर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या बैठकीतून अप्रत्यक्षरीत्या सोनवणेंच्या उमेदवारीला विरोध झाला होता. परंतु पक्षाने या ठरावाला बगल देत सोनवणेंनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठरावाचे आता काय करणार? असा प्रश्न कार्यकर्ते विचारत आहेत.
अगोदर इच्छूक, आता प्रचारक...
लोकसभा निवडणुकीसाठी साधारण दोन महिन्यांपासून काहीजण उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते. यामध्ये प्रा. सुशीला मोराळे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड आदींचा यात समावेश होता. आता हेच इच्छुक बजरंग सोनवणे यांच्यासोबत प्रचार करत आहेत. विशेष बाब म्हणजे निष्ठावंतांनाच उमेदवारी द्यावी, असा ठराव घेतलेले माजी आ. साठे, डॉ. काळे आदी नेतेही सोनवणेंचे स्वागत अन् प्रचार करताना दिसत आहेत.
आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात
लोकसभा निवडणूक अनुषंगाने आता उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात झाली आहे. पंकजा मुंडे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही असे वक्तव्य केले होते, त्यावर सोनवणेंनी टीका केली. सत्ता असतानाही मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, आरक्षण द्या आता माघार घेतो, असे ते म्हणाले. यावर सोनवणेंना माघार घेण्याची गरज नाही. त्यांनी दुसऱ्यांदा पराभूत होण्यासाठी निवडणूक लढवावी, असा टोला पंकजा मुंडे यांनी लगावला.
ठराव घेणाऱ्यांच्या मनात खंत
आम्ही ठराव घेऊन पक्षाकडे पाठविला. त्यांनी उमेदवारी दिली म्हणजे आमची मागणी मान्य झाली नाही. याची खंत मनात नक्कीच आहे. परंतु पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय योग्य समजून स्वागत अन् प्रचार करत आहोत, असे ठरावावर स्वाक्षरी असलेले डॉ. नरेंद्र काळे म्हणाले, तर केज विधानसभा अध्यक्ष सुरेश पाटील व माजी आ. पृथ्वीराज साठे यांनी फोन न घेतल्याने प्रतिक्रिया मिळाली नाही.